रावळगाव, सातमाने, दुंधे, तळवाडेसह परिसरातील शेतशिवाराकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला आहेPudhari News Network
Published on
:
04 Feb 2025, 4:37 am
Updated on
:
04 Feb 2025, 4:37 am
मालेगाव : रावळगाव, सातमाने, दुंधे, तळवाडेसह परिसरातील शेतशिवाराकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. मागील पंधरवड्यात चोरट्यांनी शेतकर्यांच्या मळ्यातील वीजपंप, पाणबुडी, पिस्टन व शेती उपयोगी साहित्य चोरून नेले. रावळगावला पोलिस दूरक्षेत्र व वडनेर खाकुर्डीला पोलिस ठाणे असूनदेखील चोरट्यांचा सुगावा लागत नसल्यामुळे शेतकर्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चोरटे वीजपंप, पाणबुड्यांना लक्ष्य करत आहेत. हे साहित्य चोरीला गेल्यास शेतकर्यांना हात उसनवार पैसे घेऊन 15 ते 20 हजार रुपयांचा शेतीपंप विकत घ्यावा लागतो. वीजपंप चोरीच्या घटनांमुळे शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांना जेरबंद करावे.
विजय वडक्ते, सामाजिक कार्यकर्ते, रावळगाव
रावळगाव, सातमाने, दुंधे, तळवाडेसह परिसरात यंदा बर्यापैकी पाणी आहे. त्यातच काही ठिकाणी रात्री वीज राहात नसल्याने बहुतांश शेतकरी दिवसा पिकांना पाणी देतात. याचा फायदा घेत भुरट्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. या भुरट्या चोरांनी गेल्या वर्षभरात रावळगाव, सातमानेसह परिसरातील 40 हून अधिक शेतकर्यांच्या शेतातील वीजपंप, पाणबुडी, पिस्टन व शेती उपयोगी साहित्य तसेच पाळीव जनावरे, दचाकी चोरून नेल्या आहेत. या चोरांचा तपास लागत नसतानाच चोरट्यांनी पुन्हा शेतवस्तीकडे आपला मोर्चा वळवला आहे. मागील पंधरवड्यात दिलीप जाधव, राजेंद्र शिरोडे, जयेश शिरोळे, बाबूराव राजनोर, योगेश राजनोर, सुभाष गेंद, बबलू आखाडे, पुंडलिक बच्छाव आदींसह अनेक शेतकर्यांचे वीजपंप, पाणबुडी, पिस्टन व शेती उपयोगी साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे. यामुळे शेतकर्यांना रब्बी पिकांना पाणी देण्यास अडचणी येत असून, साहित्य चोरीला गेल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. रावळगावला पोलिस दूरक्षेत्र व वडनेर खाकुर्डीला पोलिस ठाणे असूनदेखील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चोर्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश येत आहे. पोलिसांनी आपले कसब पणाला लावत चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.