टोळीने गोळीबार करणाऱ्या संशयितांपैकी एकावर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना पंचवटीत घडली आहे.Pudhari News Network
Published on
:
04 Feb 2025, 4:46 am
Updated on
:
04 Feb 2025, 4:46 am
नाशिक : पंचवटीतील नागचौक परिसरात एका टोळक्याने प्रतिस्पर्धी टोळीवर गोळीबार केल्याची घटना रविवारी (दि.2) रात्री 10.30 वाजता घडली. त्यानंतर दुसऱ्या टोळीने गोळीबार करणाऱ्या संशयितांपैकी एकावर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना रात्री 11 वाजता गजानन चौकात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वर्चस्ववादाच्या स्पर्धेतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
योगेश जगन मोरकर (31, रा. नागचौक) याच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.2) रात्री ते मित्रांसह परिसरात क्रिकेट खेळत होते. त्यावेळी संशयित रुपेश उर्फ वाळ्या गरड याच्यासोबत वाद झाला. त्यानंतर संशयित ऋषिकेश उर्फ सोंडग्या गरड, नितीन जाधव, हरदिपसिंग औलक व हर्षल यांनी शिवीगाळ करीत दमदाटी केली. तसेच ऋषिकेश याने त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे योगेशने ऋषिकेशला विरोध केला असता संशयितांनी त्यास झटका मारून पसार झाले.
याप्रकरणी संशयितांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर हरदिपसिंग बलवंतसिंग औलक (27, रा. नागचौक) याच्या फिर्यादीनुसार, संशयित योगेश, साहिल उर्फ इटली, सोहम जोशी, राहुल कानडे व इतर चौघांनी रात्री अकराच्या सुमारास गजानन चौक परिसरात हल्ला केला. हरदिपसिंग याच्या फिर्यादीनुसार, तो घराकडे पायी जात असताना संशयितांनी कुरापत काढून दमदाटी करीत साहिलने धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली. तर इतर संशयितांनी मारहाण केली. परिसरात गर्दी झाल्याने संशयित पळून गेल्याचे हरदिपसिंग याने सांगितले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून पोलिस तपास करीत आहेत.
शुक्रवारी गणेशवाडी व हिरावाडी परिसरातील दोन गटात पोलिसांसमोरच दगडफेक, काचेच्या बाटल्या एकमेकांवर फेकत परिसरात दहशत करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर एका गट हिरावाडी परिसरात गेला. मात्र तेथे गोळीबार झाल्याने हा गट पुन्हा माघारी फिरल्याचे बोलले जाते. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही तपासून या घटनेची पडताळणी करण्याची मागणी होत आहे. या घटनेनंतर काही तासांतच नागचौकात वर्चस्ववादातून दोन गट भिडल्याने पंचवटीत टोळीयुद्धाचा भडका उडाल्याचे बोलले जात आहे.