नेकनूर रूग्णालय इमारतीच्या स्लॅबची प्लेट कोसळून मजुराचा मृत्यूFile Photo
Published on
:
04 Feb 2025, 7:28 am
Updated on
:
04 Feb 2025, 7:28 am
नेकनूर : पुढारी ऑनलाईन
नेकनूरच्या कुटीर रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यावेळी स्लॅबची प्लेट अंगावर पडल्याने सोमवारी शंभु दास (वय 38) या मजुराचा दुर्देवी मृत्यू झाला. काम उरकण्याची गडबड दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असून कमी कालावधीत तिसरा स्लॅब टाकण्याचे गुत्तेदाराचे धोरण मजुरासाठी जीवघेणे ठरल्याचे बोलले जात आहे.
नेकनूर कुटीर रुग्णालयाच्या तीन मजली नवीन इमारतीच्या कामात सुरुवातीपासूनच दर्जा ढासळल्याचे पाहायला मिळाले. इतर ठिकाणाहून काँक्रीट मिक्स करून या ठिकाणी वापरले जात असल्याने या कामाच्या दर्जाबाबत सुरवातीपासूनच प्रश्न उभा राहिला, मात्र संबंधित गुत्तेदाराने मनमानी कायम ठेवत काम उरकण्याचा सपाटा सुरू ठेवला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी एका परराज्यातील मजुराला यामुळे जीव गमावा लागला.
पश्चिम बंगाल येथील शंभू दास या मजुराचा स्लॅब खोलताना प्लेट डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे या कामावर मजुराच्या सुरक्षेची कुठलीच काळजी घेतली गेली नसल्याचे समोर आले. परराज्यातील मोठ्या प्रमाणात मजूर या ठिकाणी काम करीत आहेत.