Budget 2025 | मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. file photo
Published on
:
04 Feb 2025, 7:28 am
Updated on
:
04 Feb 2025, 7:28 am
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प (BMC Budget 2025) मंगळवारी (दि.4) सकाळी 11 वाजता आयुक्त भूषण गगराणी यांना सादर करण्यात आला. अर्थसंकल्पाचे आकारमान 14.19 टक्क्यांनी वाढले आहे. 2024 -25 मध्ये 65 हजार 180 कोटी 80 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. 2025- 26 मध्ये या अर्थसंकल्पाचे आकारमान 74 हजार 427 कोटी 41 लाख रुपये इतके आहे. विविध विकास कामांसाठी 43 हजार 165 कोटी 23 लाख रुपये आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
12 हजार 858 कोटी मुदत ठेवींतून विकास कामे करण्यात येणार आहेत. 2025-26 या आर्थिक वर्षात महापालिकेला 43 हजार 959 कोटी 40 लाख रुपये उत्पन्न मिळेल, असे अपेक्षित आहे. मुंबईत सुरू असलेल्या इमारतींच्या कामातून सुमारे 9700 कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता करातून 5200 कोटी रुपये महसूल मिळणे अपेक्षित आहे.
जकातीपोटी राज्य सरकारकडून मिळणारी भरपाई अनुदान 14 हजार 398 कोटी 16 लाख रुपये इतके आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्च 17 540 कोटी 47 लाखांवर गेला आहे. मुंबईत 2 लाख 32 हजार 412 कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. सध्याच्या कर आकारणी शुल्कामध्ये वाढ करण्याचे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संकेत दिले आहेत.
अतिरिक्त चटई क्षेत्रापोटी घेण्यात येणाऱ्या अधिमूल्यमध्ये 50 टक्के पर्यंत वाढ करण्यात आल्यामुळे महापालिकेला येणाऱ्या आर्थिक वर्षात 300 कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. तर आतापर्यंत 70 कोटी रुपये इतका अतिरिक्त महसूल प्राप्त झाला आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या उद्योगधंद्यांना किमान 20 टक्के मालमत्ता कर लावण्यात येणार असून यातून 350 कोटी रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.
शिक्षण विभागासाठी ३ हजार ९५५. ६४ कोटींचा अर्थसंकल्प
मुंबई महानगरपालिकेने आपल्या शिक्षण विभागासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ३ हजार ९५५. ६४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त आशुतोष सैनी यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सादर केला. प्रशासकाच्या राजवाटीतील हा दुसर्या अर्थसंकल्पात गतवर्षीच्या तुलनेत ११.५७ टक्क्यांनी म्हणजेच ४५७.८२ कोटींची वाढ केली आहे.
गतवर्षी शिक्षण विभागाचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ३ हजार ४९७.८२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात थोडी सुधारणा करत विद्यार्थ्यांना अर्थिक सहाय्य देण्याबरोबरच ई लर्निंगला महत्त्व देत जुन्या योजनांना या अर्थसंकल्पात पुन्हा बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे.