Published on
:
04 Feb 2025, 7:28 am
Updated on
:
04 Feb 2025, 7:28 am
पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील 16 गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागणार माळमाथा परिसरातील वासखेडी येथील विज उपकेंद्राच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे, उप अभियंता साक्री गणेश जाधव उपस्थित होते.
आमदार मंजुळा गावित यांनी सांगितले की, मागील आमदारकीच्या कालावधीत शेतकऱ्यांचा जिव्हाळयाचा प्रश्न असलेल्या विजेच्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करुन कृषी संजीवनी योजनेंतर्गत धाडणे, टिटाणे आणी वासखेडी येथे कृषी विषयक योजनेंतर्गत 33 केव्ही क्षमतेचे विज उपकेंद्र मंजुर करुन घेतले. त्यापैकी मंगळवार (दि.4) वासखेडी येथे 33/11 केव्ही क्षमतेचे विज उपकेंद्र पूर्ण झाले असून त्याचे आज लोकार्पण करण्यात आले.
या उपकेंद्रासाठी 2 कोटी खर्च आलेला असुन उपकेंद्राची क्षमता 5 एम.व्ही. इतकी आहे. या उपकेंद्रातुन 11 केव्ही क्षमतेची चिपलीपाडा परिसरात कृषीपंपासाठी विद्युत लाईन दिलेली असून त्यावरुन चिपलीपाडा, वरसुस, जामकी आणी वासखेडी परिसरातील 600 ते 650 शेतक-यांना विज पुरवठा केला जाईल. याच उपकेंद्रातून 11 केव्ही क्षमतेची दुसरी विद्युत लाईन असुन त्यावरुन डोमकानी, तलावपाडा, गोलदरपाडा, नारळपाडा, दिवल्यामाळ, मडगाव परिसरातील 800 शेतकऱ्यांना विज पुरवठा केला जाईल. तिसऱ्या वासखेडी गावठाण या विद्युत लाईनवरुन वासखेडी, वरसुस, डोमकानी, खुडाणे, चिपलीपाडा इ.गाव परिसरातील सुमारे 1200 घरगुती ग्राहकांना विजपुरवठा केला जाईल.
वासखेडी सबस्टेशनमुळे 1400 कृषीपंपांना तर 1200 घरगुती ग्राहकांना विजपुरवठा केला जाणार आहे आणि त्यामुळे जैताणे सबस्टेशनचा विजेचा लोड कमी होईल. जैताणे वासखेडी परिसरातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटणार आहे. मंगळवार (दि.4) वासखेडी येथील विज उपकेंद्राचे लोकार्पण झाले असुन या विज उपकेंद्रावरुन येत्या 2 ते 4 दिवसांत सर्वत्र विज पुरवठा सुरु होणार असल्याने ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर धाडणे आणि टिटाने या दोन्ही विज उपकेंद्रांचे काम प्रगतीत असुन महिना अखेरीस धाडणे येथील विज उपकेंद्राचे लोकार्पण केले जाईल. वासखेडी विज उपकेंद्रामुळे जैताणे विज उपकेंद्रावरील भार कमी होणार असून माळमाथा परिसरातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक अडचणींवर मात करुन प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आम्हाला होत आहे असे डॉ. तुळशिराम गावित यांनी सांगितले.
आमदार मंजुळा गावित यांनी शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन परिसरातील विजेचा प्रश्न सोडवल्याबद्दल माळमाथा परिसरातील जनतेच्या वतीने महेश ठाकरे यांनी सांगितले. अभियंता ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. माजी प.स.सदस्य अशोक मुजगे यांनी सुत्रसंचलन केले. मान्यवरांचा सत्कार कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी केला. कार्यक्रम प्रसंगी निजामपूरचे ए. पी. आय मयूर भामरे, प. स. सतिष वाणी, ईश्वर ठाकरे, वासुदेव भदाणे, समता परिषदेचे राजेश बागुल, खोरी सरपंच मुकुंद बोरसे, वासदरे सरपंच नाना मगरे, कृ.उ.बा. श संचालक वसंतदादा पवार, सागर गावित, वारकरी संप्रदायाचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत वासखेडीचे सर्व सदस्य उपस्थित होते. विजेचा प्रश्न सोडविल्याबद्दल परिसरातील सरपंच व मान्यवरांनी आमदार मंजुळा गावित व डॉ. तुळशीराम गावित यांचे आभार मानून सत्कार केला.