Published on
:
04 Feb 2025, 4:48 am
Updated on
:
04 Feb 2025, 4:48 am
मुंबई : Maharashtra politics | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयात बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित न राहिल्याने त्यांची नाराजी अद्याप कायम असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
खातेवाटप, पालकमंत्रिपद आणि अधिकार यावरून शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यामुळेच शिंदे हेही नाराज असल्याच्या चर्चा वाढल्या आहेत. याशिवाय नगरविकास आणि पाणी पुरवठा मंत्रालयाच्या नियोजित बैठकाही त्यांनी रद्द केल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्वांना उधाण आले आहे. सोशल वॉररूमची विशेष बैठक सोमवारी मंत्रालयात पार पडली. या बैठकीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांशी निगडित चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावलेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मात्र दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी नगरविकास आणि पाणी पुरवठा मंत्रालयाची आढावा बैठक बोलावली होती. तीही रद्द करण्यात आली. नव्या सरकारमधील खातेवाटपावरून आणि पालकमंत्रिपदाचे वाद आहेत. सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिने उलटलेले असतानाही महायुतीतील आणि सरकारमधील वाद शमविण्यात प्रमुख नेत्यांना यश आलेले नाही.
जनता दरबारामुळे नाराजीत भर?
शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत. ठाणे जिल्ह्यातील भाजप नेते गणेश नाईक हे मंत्रिमंडळात असून ते पालघरचे पालकमंत्री असतानाही त्यांनी ठाणे जिल्ह्यातील लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत सोमवारी ठाण्यात जनता दरबार घेतला. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही शिंदे यांची प्रत्यक्ष अनुपस्थिती होती. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच या बैठकीला हजेरी लावली होती. प्रत्यक्ष हजेरी न लावून एकमेकांसमोर येणे त्यांनी टाळले असल्याची चर्चा झाली.