Published on
:
03 Feb 2025, 11:30 pm
Updated on
:
03 Feb 2025, 11:30 pm
बीजिंग : चीन्यांच्या अजब देशात लपवाछपवी, फसवेगिरी हा जणू काही राष्ट्रीय कायदाच आहे. कंजूष मालक आणि त्याला गंडा घालणारे इरसाल भाडेकरू हे कथानक उभ्या महाराष्ट्रानं ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटामधून पाहिलं. आता असाच काहीसा प्रकार चीनच्या जियांग्सू प्रांतात घडला आहे. इथे एका घर मालकासोबत ‘शुद्ध हलकटपणा’ घडला आहे; पण त्याला गंडा घालणारे भाडेकरू नसून जुनी घरमालकीण आहे. विशेष म्हणजे हा प्रकार त्याला तब्बल 7 वर्षांनी लक्षात आला आहे.
जियांग्सू प्रांतातील ली नावाच्या व्यक्तीनं 7 वर्षांपूर्वी 2 मिलियन युआन (2.24 कोटींपेक्षा अधिक) मोजून एक घर खरेदी केलं. आता त्याला घराबद्दलचं एक रहस्य समजलं आहे. घराची साफसफाई करत असताना त्याला जिन्याच्या मागे एक दार दिसलं. हे दार लपवण्यात आलेलं होतं. ते दार तळघरात जात होतं. त्या तळघरात हवा खेळती राहण्याची व्यवस्था होती, विजेचे दिवे होते. इतकंच काय तर एक लहानसा बारदेखील होता. तिथे कोणीतरी राहत असल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. तळघर सापडल्यामुळे तिथे कोणीतरी असल्याच्या खुणा आढळल्यानं ली घाबरले. विशेष म्हणजे तिकडे घराची जुनी मालकीण झांग राहत होती. झांगनं घराची विक्री करताना जाणूनबुजून तळघर लपवल्याचा आरोप ली यांनी केला. त्यावर झांगनंदेखील युक्तिवाद केला. ‘मी तुम्हाला घर विकलं होतं. त्यात तळघराचादेखील समावेश असल्याचं मी तुम्हाला कधीही सांगितलं नव्हतं,’ असं तर्कट तिनं मांडलं. ‘तळघराची जागा मी माझ्या मनोरंजनासाठी वापरायचे, वापरते. तळघराचा समावेश आपल्या व्यवहारात नाही. घरातला दिवाणखाना तुमचा आहे. मग मी माझ्या मोकळ्या वेळेत तळघरात आराम करूच शकते ना? त्या तळघराचा व्यवहार आपण केलेलाच नाही,’ असं झांग म्हणाल्या. त्या गेल्या 7 वर्षांपासून तळघरात राहत होत्या. झांग कोणालाच कोणताही थांगपत्ता न लागता तळघरात कशा पोहोचल्या, ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तळघरात जाण्यासाठी एखादा अन्य मार्ग उपलब्ध असावा किंवा झांग यांच्याकडे एखादी अधिकची चावी असावी, असा कयास आहे. झांग तळघरावर हक्क सांगत असल्यानं वैतागलेल्या घरमालक ली यांनी न्यायालयात धाव घेतली. तिथे त्यांच्या बाजूनं निकाल लागला. घरासोबत तळघराची मालकीदेखील ली यांच्याकडेच जाते आणि झांग यांनी त्यांना आर्थिक भरपाई द्यावी, असा आदेश न्यायालयानं दिला.