‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागात झालेली पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यातील वादग्रस्त कुस्ती आता न्यायालयाच्या कोर्टात रंगणार आहे. मी चितपट झालो नसतानाही मला पराभूत केले, असा आरोप शिवराजने केला असून तो आता आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहे.
काल प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादग्रस्त निर्णयाचे गालबोट लागले. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ नवा ‘महाराष्ट्र केसरी’ झाल्यापेक्षा शिवराज राक्षेने पंचांना मारलेल्या लाथेचीच सर्वत्र चर्चा होती. आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या भरात शिवराजने पंचांविरुद्ध केलेल्या गैरवर्तनासाठी त्याच्यावर तीन वर्षांची बंदी लादण्यात आली आहे. हे प्रकरण आता लवकर शमणार नसल्याचे संकेत शिवराजने आज दिलेत. मी पृथ्वीराजविरुद्ध लढत होतो, चीतपट झालो नव्हतो. तरीही मला पराभूत जाहीर केले. मी लढतीचा रिह्यू (व्हीडीओ) दाखवण्यासाठी पंचांकडे दाद मागितली, पण त्यांनी दाखवला नाही. त्यामुळे माझ्यावर अन्याय झालाय. मी न्यायालयात दाद मागणार आहे, असे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने जाहीर केले आहे. दरम्यान, त्याचे प्रशिक्षक रणवीर पोंगल यांनी एक कोटीचे चॅलेंज दिले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हिडिओ पाठवून त्यांच्याकडून शिवराज पराभूत झाल्याचे सिद्ध करा, असे आव्हान दिले आहे.
काल गादी विभागातील दोन्ही अंतिम लढती वादग्रस्त ठरल्या. माती विभागात महेंद्र गायकवाडने (सोलापूर) व साकेत यादवचा (परभणी) पराभव करत त्याने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत प्रवेश केला.
पंचाला जन्मठेप द्या – काका पवार
महाराष्ट्र केसरी कोण होणार, हे आधीच ठरलं जातं, असा गंभीर आरोप खुद्द शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडचे वस्ताद अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी केला आहे. जर राक्षे आणि गायकवाडवर तीन वर्षांची बंदी लादण्यात आलीय, तर पंचालाही जन्मठेपेची शिक्षा द्या. मी शिवराजच्या चुकीला पाठीशी घालणार नाही, असेही पवार म्हणाले.
एक कोटीची पैज लावतो – पोंगल
महाराष्ट्र केसरी कोणाला करायचे हे आधीच ठरलेले असावे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघ वन मॅन शो आहे. एकच माणूस तो चालवतो आहे. सर्वत्र अराजकता माजलीय. शिवराजचा एकच खांदा खाली टेकला होता. त्यामुळे त्या लढतीचा व्हिडीओ दाखवण्याचा आमचा आग्रह होता, पण तो फेटाळला गेला, असा दावा शिवराजचे प्रशिक्षक रणवीर पोंगल यांनी केला. या कुस्तीचा व्हिडीओ देशाच्या कुस्ती संघटनांकडे व आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघांकडे पाठवला जावा. त्यांनी शिवराज हरल्याचे स्पष्ट केले तर मी एक कोटी देईन, अशी पैजही पोंगल यांनी लावली आहे.