Published on
:
04 Feb 2025, 2:12 am
Updated on
:
04 Feb 2025, 2:12 am
राशिवडे; प्रवीण ढोणे : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या, तसेच अनेक वर्षांपासून न्यायालयीन वादात अडकलेल्या भोगावती साखर कारखान्याच्या सभासदांच्या मालकीच्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळावर अखेर सत्ताधार्यांनीच सत्तेचा झेंडा फडकावला. यामध्ये मोठे मताधिक्य देत ‘किंगमेकर’ची भूमिका करवीर तालुक्याने बजावली. 13 पैकी सर्व 13 जागांवर काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी (ए. वाय. गट), ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे गट, जनता दल स्वाभिमानी आघाडीच्या राजर्षी शाहू आघाडीने मताधिक्य घेतले असून, भाजप, शिवसेना (नरके गट), राष्ट्रवादी (धैर्यशील पाटील गट), आघाडीच्या दादासाहेब पाटील-कौलवकर शिवशाहू आघाडीची रात्री बारापर्यंत पराभवाकडे वाटचाल सुरू होती. भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 2) मतदान झाले. राधानगरी व करवीर तालुक्यांतील 31 मतदान केंद्रांवर एकूण 28 हजार 959 मतदानापैकी 22 हजार 387 मतदान झाले, यामध्ये करवीर तालुक्यातील 10 हजार 936, तर राधानगरी तालुक्यातील 11 हजार 451 मतदानाचा समावेश आहे. सोमवारी सकाळी भोगावती कारखान्याच्या मुख्य कार्यालयामध्ये 16 टेबलवर 40 कर्मचार्यांच्या मदतीने मतमोजणीस प्रारंभ झाला.
सुरुवातीला करवीर तालुक्यातील सर्व गावांसह राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली गावातील मतपत्रिका एकत्रित करून मतमोजणी सकाळी 11 वाजता सुरू झाली. फुटीर मतांची संख्या जास्त असल्याने मतमोजणी करण्यात विलंब होत गेला. करवीर तालुक्यातील पहिल्या फेरीत 11 हजार 385 मते मोजण्यात आली. यामध्ये 384 मते बाद ठरली. उर्वरित 11 हजार 769 मते मोजल्यानंतर निवडणूक अधिकारी अरुण भुईबर, रागिणी खडके यांनी साडेआठ वाजता पहिली फेरी जाहीर केली, यामध्ये सत्ताधारी गटाने 591 ते 1,470 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर राधानगरी तालुक्यातील मतमोजणीस सुरुवात झाली, तर राधानगरी तालुक्यातही सत्तारूढ गटाने मताधिक्यामध्ये बाजी मारल्याने जल्लोष सुरू झाला. रात्री बारापर्यंत सत्तारूढ गटाची विजयाकडे आगेकूच सुरू होती. दोन्ही तालुक्यांत फुटीर मतदानाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मतमोजणीस विलंब होत होता.
पी. एन. गटाला रोखण्याचा नरकेंचा प्रयत्न असफल
करवीरमध्ये आमदार चंद्रदीप नरकेंनी स्व. पी. एन. पाटील गटाला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्न असफल ठरला. परंतु, पी.एन. गटाला मताधिक्याचा ब्रेक देण्यात नरके यशस्वी ठरले.
राहुल, क्रांतिसिंह ठरले विजयाचे शिल्पकार
करवीर तालुक्यामध्ये पी.एन. गटाचे मताधिक्य कमी करण्यात आमदार चंद्रदीप नरके यशस्वी ठरले असले, तरी राहुल पाटील व क्रांतिसिंह पाटील विजयाचे शिल्पकार ठरले.