मुंबईतल्या तीनही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉकfile photo
Published on
:
08 Feb 2025, 4:21 am
Updated on
:
08 Feb 2025, 4:21 am
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईतल्या तीनही रेल्वे मार्गावर उद्या (रविवार) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर आज (शनिवार) रात्री आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत या ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बर मार्ग सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल- कुर्ला – पनवेलदरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम मार्गिकेवरील स्थानकांवरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे वर ग्रॅण्ट रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. चर्चगेटला येणाऱ्या काही अप लोकल वांद्रे / दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत.