विजयानंतर जल्लोष करताना आ. राजू खरे व कार्यकर्ते.Pudhari Photo
Published on
:
24 Nov 2024, 12:52 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:52 am
पोखरापूर : मोहोळ विधानसभा मतदारसंघात राखीव असलेल्या तीन टर्मनंतर परिवर्तन घडले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजू ज्ञानू खरे यांनी 30 हजार 202 मतांनी विजय मिळविला. त्यांना 1 लाख 25 हजार 838 मते मिळाली आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल माने माने यांना 95 हजार 636 मते मिळाली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयानंतर मोहोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
मोहोळ येथील शासकीय धान्य गोदामात शनिवारी सकाळी 8 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांच्या देखरेखीखाली मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये 2026 पोस्टल मतांपैकी 92 मते अवैध ठरली. राजू खरे यांना 1049 मतं पडली, तर यशवंत माने यांना 827 मते मिळाली. पहिल्या दोन फेर्यांमध्ये महायुतीचे यशवंत माने पिछाडीवर होते, त्यानंतर तिसर्या-चौथ्या-पाचव्या फेरीमध्ये यशवंत माने यांनी मतांची आघाडी मिळवली; मात्र सातव्या फेरीमध्ये राजू खरे यांनी जवळपास 5 हजार मतांची आघाडी घेतली. त्यानंतर शेवटच्या काही फेर्यांपर्यंत ते आघाडीवरच राहिले.
उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागात यशवंत माने यांना मताधिक्य मिळाले, परंतु राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील मिळविलेले मताधिक्य त्याला छेदू शकले नाही. 16 व्या फेरीमध्ये राजू खरे यांना 27 हजार 500 मतांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर हजार ते दीड हजार मतांच्या आकडेवारीमध्ये कमी-जास्त प्रमाणात फरक पडत गेला. शेवटच्या 24 व्या फेरीमध्ये राजू खरे यांना 1 लाख 24 हजार 789 मते मिळाली, तर यशवंत माने यांना 94 हजार 809 इतकी मते मिळाली. शेवटची फेरी 9 हजार 43 मतांची होती. त्यामध्ये राजू खरे व यशवंत माने यांना जवळपास समान मते मिळाली, तर राजू खरे यांना 1 हजार 49 यांना 857 पोस्टल मतं मिळाली असून, यामध्येदेखील राजू खरे यांनी आघाडीच मिळविली. विद्यमान आमदार यशवंत माने यांचा नवखे उमेदवार राजू खरे यांनी 30,202 मतांनी दणदणीत विजय मिळविला. विजयानंतर मोहोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची मुक्तपणे उधळण करत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.