प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकरPudhari File Photo
Published on
:
18 Nov 2024, 11:15 am
पणजी : राज्यात घडत असलेले ‘कॅश फॉर जॉब’ची प्रकरणे पाहता, राजकीय सहभाग असल्याशिवाय हे शक्य नसल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली आहे. हे एकूणच प्रशासकीय द़ृष्ट्या अत्यंत घातक असून गुणवत्ता प्राप्त तरुणांवर अन्याय करणारे आहे, असेही पार्सेकर म्हणाले.
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याची राज्यभरातील 29 प्रकरणे समोर आली असून पोलिसांनी यामध्ये आतापर्यंत 33 जणांना अटक केल्याची माहिती शनिवारी पोलिस प्रमुख अलोककुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी पोलीस महानिरीक्षक ओमवीरसिंग, पोलीस अधीक्षक सुनिता सावंत, अक्षत कौशल उपस्थित होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रकरणे 2015 पासूनची आहेत. मात्र आत्तापर्यंतच्या तपासात या प्रकरणांशी राजकीय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले नाही, असे सांगत राजकीय व्यक्तींना ’क्लीन चीट’ दिली आहे. यावर पार्सेकर म्हणाले, संपूर्ण प्रकरणांची सखोल चौकशी झाल्याशिवाय पोलिसांनी कुणालाच क्लीन चीट देऊ नये. यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही नाराजी व्यक्त करत, पोलिसांवर भाजपच्या प्रवक्तेपणाची टीका केली आहे. याबाबत पार्सेकर म्हणाले, संपूर्ण प्रकरणांची चौकशी व्हावी. संबंधित अटक केलेल्या आरोपींकडून यापूर्वी ही पदे कोणाकोणाला देण्यात आली, त्याचीही चौकशी व्हावी. ज्यांनी अशा प्रकारच्या सरकारी नोकर्या दिल्या आहेत, त्यांनी सरकारी नोकर्यांची दुकाने मांडलेली नव्हती. त्याचाच अर्थ त्यांनी यापूर्वी कोणालातरी नोकर्या दिलेल्या आहेत. दुसरीकडे ज्यांनी अशा प्रकारच्या नोकर्या विकत घेतलेल्या आहेत. त्यांच्याकडूनही चूक झाली असून गुन्हा घडलेला आहे. त्यांचाही शोध घ्यावा लागेल. फोंड्यामध्ये अशी प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडल्याचे दिसून येत असून फोंडयात चार मंत्री आहेत. त्यांचे लागेबांधे शोधावे लागतील. राज्यातील तरुणांसाठी हा घोटाळा अत्यंत घातक असून होतकरू गुणवंत तरुणांवर हा अन्याय करणारा आहे.
लक्ष्मीकांत पार्सेकर 2014 ते 17 या काळात राज्याचे मुख्यमंत्री होते. पोलिसांच्या माहितीनुसार, ही प्रकरणे 2015 पासूनचे आहेत. याबाबत बोलताना पार्सेकर म्हणाले, आपल्या कार्यकाळात अशी प्रकरणे घडलेली नाहीत किंवा माझ्याविरोधात कोणीही एका उमेदवारांनी अशा प्रकारची तक्रार दिली, तर आपण राजकीय संन्यास घेईन.