Published on
:
18 Nov 2024, 1:26 pm
Updated on
:
18 Nov 2024, 1:26 pm
नागपूर : महाराष्ट्रात महायुती १६५ जागांवर विजयी होणार असून मजबूत सरकार येईल, असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा-महायुतीचा जाहीरनामा मान्य केला असून काँग्रेसचा जाहीरनामा बाजूला केला, तो धूळ खात पडला. तो कुणीही मान्य करीत नाही. काँग्रेसचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असेही ते म्हणाले.
बावनकुळे म्हणाले, गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याण, शेतकरी कल्याण यासह वीज बिलात ३० टक्के कपात व लाडकी बहीण योजना अशा २५ महत्वाच्या विषयावर महायुती काम करणार आहे. वृत्तपत्रातून प्रकाशित झालेली भाजपा-महायुतीची जाहिरात खरी असून मविआची जाहिरात ही खोटी आहे. जाहिरातीशिवाय ते काहीच करू शकत नाही. महायुतीची बरोबरी साधू शकत नाही. मविआमध्ये प्रचंड ओढातान सुरू आहे. चार महिन्यातच जनतेने काँग्रेसची साथ सोडली. आज हरियाणासारखी परिस्थिती महाराष्ट्रात आहे.
शरद पवार यांनी विकासावर बोलावे
शरद पवारांच्या नादी लागण्याची आम्हाला गरज नाही. त्यांचे काम त्यांनी करावे, आम्ही आमचे काम करू, आमच्याकडे मोदी आणि महायुती सरकारचे काम आहे. ईडी-सीबीआयचे रडगाणे आता पुरे झाले. माझ्या कामठी मतदारसंघातील दीड लाख कुटुंबांशी माझे पारिवारिक संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.