बारामतीत पवारांच्या दोन्ही सभांना कुटुंबीय उपस्थित होते.
Published on
:
18 Nov 2024, 3:33 pm
Updated on
:
18 Nov 2024, 3:33 pm
बारामती : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीत महायुती व महाविकास आघाडीच्या दोन स्वतंत्र सांगता सभा पार पडल्या. एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आज (दि.१८) पार पडली. कुटुंबातीलच ही लढाई असल्याने या दोन्ही सभांकडे लक्ष लागले होते. या दोन्ही सभांना त्या त्या कुटुंबातील सदस्यांनी आवर्जून हजेरी लावली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सांगता सभा मिशन हायस्कूल मैदानावर पार पडली. या वेळी त्यांच्या आई आशाताई पवार , पत्नी सुनेत्रा पवार, बहीण विजया पाटील, नीता पाटील, रजनी इंदुलकर, पुत्र पार्थ व जय पवार यांची उपस्थिती होती. आशाताई पवार या अशा सभांपासून कायम दूर असतात. परंतु, बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर त्या यंदा सभेला उपस्थित राहिल्या. कार्यकर्त्यांमध्ये बसून त्यांच्यासह अजित पवार यांच्या भगिनींनी सभा ऐकली. पार्थ हे तर सभास्थानी एका दुचाकीवर बसून सभा ऐकत होते. दुसरीकडे मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांची प्रचार सांगता सभा मोरगाव रस्त्यावर लेंडीपट्टा मैदान येथे पार पडली. या सभेला शरद पवार यांनी संबोधित केले. प्रतिभा पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती यांची यावेळी उपस्थिती होती.
आशाताई पवारांच्या पत्राचे सभेत वाचन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगता सभेला त्यांच्या मातोश्री आशाताई पवार उपस्थित होत्या. त्यांच्या पत्राचे वाचन सभेत किरण गुजर यांनी केले. एक आई म्हणून माझे दुःख मलाच माहीत आहे. अजितवर काय अन्याय झाला आहे आणि तो काय सोसतोय, हे मला माहीत आहे. आजही कुटुंबासाठी तो काही गोष्टी बोलत नाही, स्वतः सगळे सहन करत आहे. त्याचे मन मोठे आहे. तुम्ही बारामतीकरांनी त्याच्या पाठीशी उभे राहावे, असा मजकूर या पत्रात होता.