Published on
:
18 Nov 2024, 4:32 pm
Updated on
:
18 Nov 2024, 4:32 pm
यवतमाळ : महिलेच्या गळ्यातून सोन्याचे दागिने हिसकविण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या असताना आता चोरट्यानी तरुणांकडे लक्ष केंद्रित केले आहे. बसस्थानकावर उभ्या असलेल्या एका तरूणाच्या गळ्यातील दीड लाखाचा सोन्याचा गोप लंपास करणाऱ्या दोघांना लाडखेड पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई आज सोमवारी करण्यात आली. हा लुटमारीचा प्रकार तिवसा बसस्थानक परिसरात शनिवारी रात्री घडला होता.
मिलिंद वसराम राठोड (वय ४०) आणि अविनाश उर्फ चोटी चरणदास चव्हाण (वय २४, दोन्ही रा. तिवसा जि. यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. प्रथमेश मुकुंदराव अबनावे (वय २५ रा. यवतमाळ) यांनी लाडखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीनूसार, लाडखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तिवसा बसस्थानक परिसरात प्रथमेश शनिवारी रात्री उभा होता. अश्यात अनोळखी दोघांनी त्याच्या गळ्यातील २२.४१ ग्रॅम वजनाचा दीड लाखाचा सोन्याचा गोप हिसकावून पळ काढला. यावेळी प्रथमेश याने आरडाओरड केली असता, ते दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी लाडखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात दोघांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. अश्यात ते दोघेही चोरटे तिवसा येथील असल्याची गोपनीय माहिती लाडखेड पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्या दोघांना सोमवारी ताब्यात घेतले. दरम्यान त्या दोघांकडून गुन्ह्यातील दीड लाखाचा सोन्याचा गोप जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी चिलुमूला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली लाडखेड ठाणेदार विशाल हिवरकर, पथकातील पोलिस अंमलदार शालीक लडके, उमेश शर्मा यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास लाडखेड ठाणेदार विशाल हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.