अमरावतीत गृह मतदानाची टक्केवारी 93.83 वर पोहोचली:174 मतदार अनुपस्थित, 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान चालले अभियान
2 hours ago
1
पंच्याऐंशी वर्षांहून अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग नागरिकांसाठी प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेला गृह मतदानाचा पर्याय ९३.८३ टक्के मतदारांनी उपयोगात आणला. केवळ १७४ मतदार या प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. १४ ते १६ नोव्हेंबर असे तीन दिवस हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या पहिल्याच दिवशी २ हजार ११६ नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १ हजार ७९४ ज्येष्ठ नागरिक आणि ३२२ दिव्यांग नागरिकांचा समावेश होता. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही काही जणांनी मतदान केले. त्यामुळे एकूण मतदानाचा आकडा २ हजार ६४४ वर जाऊन पोचला. निवडणूक यंत्रणेने या सर्वांच्या घरी जाऊन मतपत्रिकेच्या माध्यमातून त्यांचे मतदान करवून घेतले. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने ही व्यवस्था केली होती. या व्यवस्थेंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी त्यांच्या घरी जाऊन मतदान करवून घेण्यात आले. पहिल्या दिवशी सकाळी ६ वाजता या मोहिमेचा प्रारंभ झाला. तीन दिवसांत शंभर टक्के मतदान करवून घेण्याचे प्रशासनाचे उद्दीष्ट होते. परंतु प्रत्यक्षात २ हजार ८१८ मतदारांपैकी २ हजार ६४४ (९३.८८ टक्के) मतदार या प्रक्रियेत सहभागी झाले. मुळात सर्वच्या सर्व २ हजार ६४४ मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय स्वीकारला होता. परंतु त्यापैकी काही ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना औषधोपचार तसेच इतर कामानिमित्त या तीन दिवसांत बाहेरगावी जावे लागले. त्यामुळे ते मतदानापासून वंचित राहिले. गृह मतदानापूर्वी निवडणूक कामात व्यस्त असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान केले. यामध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघातील १३१६, बडनेरा येथील १४३०, अमरावतीच्या २२८९, तिवस्याच्या १०२६, दर्यापुरच्या ११८०, अचलपुर येथील १०४७, मोर्शीच्या ११७९ आणि मेळघाटच्या ११८० अशाप्रकारे १० हजार ६३८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मतदानानंतर सर्व मतपेट्या सील करण्यात आल्या असून त्या आता मतमोजणीच्या दिवशी उघडल्या जाणार आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)