देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर हिंदुस्थानातील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे वायू प्रदुषण मोठ्या प्रमाणातक वाढल्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आता शाळांसोबतच 10वी आणि 12वीचे वर्ग देखील बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सोशल मिडिया एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. ”10वी आणि 12वीचे वर्ग बंद करण्यात येत असून सर्व वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावेत”, असे त्यांनी पोस्ट केले आहे.
दिल्लीतील प्रदूषणाच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यासाठी दिल्ली सरकारने ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) चा फेज-4 लागू केला आहे. याअंतर्गत दिल्ली सरकार प्रदूषणाच्या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब करत असून दिल्ली सरकारने शाळा बंद ठेवण्याचे आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश शाळांना दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील हवेत बरेच बदल झाले आहेत. आजुबाजुच्या राज्यांमध्ये चारा जाळण्याचे प्रमाण वाढत असून त्याचा परिणाम दिल्लीतील हवेवर होत आहे. हवामान विभागाने केलेल्या चाचणीत सोमवारी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता अधिक ढासळ्याचे आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनीही आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.