Published on
:
18 Nov 2024, 4:38 pm
Updated on
:
18 Nov 2024, 4:38 pm
डोंबिवली : विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या असतानाच आता हिंसाचाराने डोके वर काढल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात घडली. नेतेगिरी करतोस का ? असा जाब विचारत चौघा हल्लेखोरांनी क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टरवर हल्ला चढविला. या हल्ल्यातून बचावलेल्या डॉक्टरने दिलेल्या जबानीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर मानपाडा पोलिसांनी चौकस तपास सुरू केला आहे. डॉ. हेमंतकुमार नन्हकू मिश्रा (53, रा. वसंत विहार, पी अँड टी कॉलनी, गांधीनगर, डोंबिवली पूर्व) असे जखमी डॉक्टरचे नाव आहे.
नेतेगिरी करतोस का ? असा जाब विचारत शिवीगाळ
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानपाडा रोडला सांगाव येथील भाऊराव धर्म दर्शन बिल्डींगमध्ये डॉ. मिश्रा यांचे शारदा नावाचे क्लिनीक आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास क्लिनिक बंद करून डॉ. मिश्रा हे घरी जाण्याची तयारी करत होते. इतक्यात पेशंटसाठी थांबविण्यास सांगण्यासाठी आलेला इसम आणि त्याच्या सोबत असलेल्या इसमाने जबदरस्तीने क्लिनीकमध्ये घुसून तू डॉक्टरी करणे आया है की, नेतेगिरी करणे आया है ? असा जाब विचारत शिवीगाळ करून चापटीने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर आणखी दोन अनोळखी इसम क्लिनीकमध्ये घुसले. त्यांनीही शिवीगाळ करून चापटीने मारहाण केली. तेव्हा त्यामधील एकाने लाकडी दांडक्याच्या साहाय्याने हल्ला चढविला. दोन्ही हाता-पायावर दांडक्याच्या उपट घालून चारही हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
जखमी अवस्थेत डॉ. हेमंतकुमार मिश्रा यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी हल्लेखोरांचे वर्णन सांगून घडलेला प्रकार कथन केल्यानंतर पोलिसांनी चौघा हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडे डॉ. मिश्रा यांच्यावर केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. हल्लेखोर नेमके कोण होते ? कोणत्या पक्षाचे होते ? डॉक्टरवर हल्ला करण्यामागचे नेमके कारण काय आहे ? आदी प्रश्नांची उकल करण्यासाठी पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे. हल्लेखोर हाती लागल्यानंतरच या साऱ्या प्रश्नांचा उलगडा होणार आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.