Published on
:
24 Nov 2024, 12:53 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:53 am
कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पुन्हा एकदा भगवा फडकला. महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांचा 29,563 मतांनी पराभव केला. क्षीरसागर यांना 1 लाख 11 हजार 85 मते, तर लाटकर यांना 81 हजार 522 मते मिळाली. या विजयाने क्षीरसागर यांनी तिसर्यांदा कोल्हापूर उत्तरमधून आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. विजयानंतर कार्यर्त्यांनी एकच जल्लोष केला.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून गतवेळी पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेना शिंदे गटातून राजेश क्षीरसागर निवडणूक रिंगणात होते. महाविकास आघाडीकडून सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली होती; पण स्थानिक नगरसेवकांनी विरोध केल्याने त्यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे यांना उमेदवारी जाहीर केली; पण अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणी मधुरीमाराजे यांनी माघार घेतल्याने नाईलाजाने काँग्रेस पक्षाने लाटकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे चुरस निर्माण झाल्याने सर्वांच्या नजरा निकालाकडे होत्या.
बावड्यात अपेक्षित मताधिक्य नाही
सुरुवातीला कसबा बावडा मतदान केंद्रातील मतमोजणीला प्रारंभ झाला. सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असणार्या बावड्यात सर्वाधिक मताधिक्य मिळेल व ते शेवटपर्यंत टिकेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये होता. लाटकर यांना पहिल्या फेरीत 2,442 मतांची आघाडी मिळाली. दुसर्या फेरीत क्षीरसागर यांना 8,274 तर लाटकर यांना 12,428 मते मिळाली. दुसर्या फेरीत 4,154 मतांची आघाडी घेतली. तिसर्या फेरीत क्षीरसागर यांचे मताधिक्य वाढले असले तरी लाटकर हे 3,861 मतांनी आघाडीवर होते. चौथ्या फेरीत क्षीरसागर यांनी 5 हजार 179 मते मिळाली. लाटकर यांना 4 हजार 504 मते मिळाली. एकूण मताधिक्यात लाटकर 3,186 मतांनी पुढे होते. पाचव्या फेरीत लाटकर यांना 3 हजार 690 तर क्षीरसागर यांना 4,197 मते मिळाली.
या फेरीत लाटकर यांना 22,362 तर क्षीरसागर यांना 26,041 मते मिळाली. या फेरीत लाटकर हे 3,679 मतांनी पुढे होते. सहाव्या फेरीत क्षीरसागर यांना अवघी 2 हजार 843 तर लाटकर यांना 4,649 मते मिळाली. या फेरीत लाटकर यांना 5,485 मतांची आघाडी होती. सातव्या फेरीत क्षीरसागर यांना चांगली मते मिळाली. त्यांना 4,434 तर लाटकर 3,454 मते मिळाली. इथे लाटकर यांची एकूण मताधिक्य घटले. ते 4,505 मतांनी आघाडीवर होते. आठव्या फेरीत क्षीरसागर यांना 4,352 मते मिळाली, तर लाटकर यांना 3,744 मते मिळाली. या फेरीत लाटकर 608 मतांनी आघाडीवर होते. दहाव्या फेरीनंतर लाटकर यांच्या एकूण मताधिक्यात घट होत गेली. या फेरीत क्षीरसागर यांना 3 हजार 658 तर लाटकर यांना 2,421 मते मिळाली. दहाव्या फेरीत लाटकर यांचे मताधिक्य केवळ 358 मतांवर आले. 11 व्या फेरीत क्षीरसागर यांना 3,658 तर लाटकर यांना 3,780 मते मिळाली. या फेरीत 296 मतांचे लिड लाटकर यांच्या पारड्यात पडले. कसबा बावड्यातून कमीत कमी 10 हजार मतांचे मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा होती; पण तेवढे न मिळता उलट 12 फेर्यांपर्यंत हे मताधिक्य घटत गेल्याने क्षीरसागर यांचे पारडे जड झाले. 12 व्या फेरीत क्षीरसागर यांना 50,798 मते तर लाटकर यांना एकूण 51 हजार 171 मते मिळली; पण हे मताधिक्य 273 मतांवर आले.
13 व्या फेरीनंतर क्षीरसागर यांच्या मताधिक्यात वाढ
राजारामपुरी, शाहूपुरी अशा भागांतील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर क्षीरसागर यांचे मताधिक्य वाढत गेले. त्यांना 13 व्या फेरीत 56,189 तर लाटकर यांना 51,171 मते मिळाली. चौदाव्या फेरीत क्षीरसागर यांना 7,643 तर लाटकर यांना 2,603 मते मिळाली. या फेरीत क्षीरसागर यांना 1,775 मतांची आघाडी मिळाली. यानंतर क्षीरसागर यांना मिळालेले मताधिक्य वाढतच गेले. 14 व्या फेरीत 63,828 तर लाटकर यांना 57,017 मते मिळाली. पंधराव्या फेरीत क्षीरसागर यांना 6,193 व लाटकर यांना 2,200 मते मिळाली. क्षीरसागर यांना एकूण 70 हजार 21 तर लाटकर यांना 59,217 मते मिळाली. या फेरीत क्षीरसागर यांना 10,804 मतांचे मताधिक्य मिळाले.
16 व्या फेरीत क्षीरसागर यांना एकूण 75,608 तर लाटकर यांना 61,612 मते मिळाली. क्षीरसागर यांना एकूण 13,996 मताधिक्य मिळाले. 17 व्या फेरीत क्षीरसागर यांना 81,057 तर लाटकर यांना 64,190 मते मिळाली. क्षीरसागर यांनी 16,867 मतांनी आघाडी घेतली. 18 व्या फेरीत क्षीरसागर यांना 6,273 मते मिळाली, तर लाटकर यांना 2,471 मते मिळाली. एकूण मतांमध्ये क्षीरसागर यांना 20,669 मतांचे मताधिक्य मिळाले. 19 व्या फेरीत क्षीरसागर यांना एकूण 92,306 मते मिळाली, तर लाटकर यांना 69,086 मते मिळाली. क्षीरसागर यांना या फेरीत 23,220 मतांचे मताधिक्य मिळाले. 20 व्या फेरीत क्षीरसागर यांना एकूण 98 हजार 55 मते मिळाली, तर लाटकर यांना 72 हजार 260 मते मिळाली. येथे क्षीरसागर यांनी 25,795 हजार मतांची आघाडी कायम ठेवली.
21 व्या फेरीत क्षीरसागर यांनी 1 लाख मतांचा टप्पा गाठला. त्यांना या फेरीत 5,749 मते मिळाली, तर लाटकर यांना 3,527 मते मिळाली. एकूण मते क्षीरसागर यांची 1 लाख 3 हजार 358 होती, तर 75 हजार 787 मते मिळाली. त्यांना 27,571 मते मिळाली. 22 व्या फेरीत क्षीरसागर यांना एकूण 1 लाख 8 हजार 43 तर लाटकर यांना 79,368 मते मिळाली. येथे 28 हजार 675 ते मताधिक्य मिळाले. 23 व्या फेरीत क्षीरसागर यांना 2,427 मते मिळाली, तर लाटकर यांना 1,430 मते मिळाली. येथे निर्णायक अशी 29 हजार 672 मतांची आघाडी घेत क्षीरसागर यांनी विजयावर शिक्कामोर्तब झाला.