Published on
:
17 Nov 2024, 11:35 pm
Updated on
:
17 Nov 2024, 11:35 pm
पॅरिस : आपल्या मेंदूला 5 ते 10 मिनिटांपर्यंत पुरेसे ऑक्सिजन मिळाले नाही तर त्याची स्थिती बिघडू शकते. मेंदू कायमस्वरूपी निकामा होऊ शकतो. मेंदू आपल्या शरीराच्या आकाराच्या तुलनेत खूप छोटा असतो. मात्र, आपल्या पूर्ण शरीरातील रक्त आणि ऑक्सिजनचा 20 टक्के हिस्सा फक्त मेंदूच वापरत असतो. याच मेंदूवर केलेल्या एका ताज्या संशोधनात असे आढळून आले आहे की, रोज आपल्या मनात 60 हजार विचार येत असतात. आपल्या मेंदूचा विकास 40 व्या वर्षांपर्यंत अविरत सुरूच असतो, असेही यात संशोधकांनी नमूद केले आहे.
एरवी, लहान मुले बराच काळ झोपतात, हे आपण नेहमी पाहिले आहे. संशोधकांनी याचेही कारण विशद केले आहे. त्यांच्या मते, छोट्या मुलांच्या शरीरात तयार होणार्या ग्लुकोजपैकी 50 टक्के हिस्सा त्यांचा मेंदूच वापरत असतो. यामुळे लहान मुलांच्या झोपेचे प्रमाणही अधिक असते. या संशोधनानुसार रोज आपल्या मनात 60 हजार विचार येत असतात आणि आश्चर्य म्हणजे त्यापैकी 70 टक्के विचार हे नकारात्मक असतात. संशोधकांनी असेही म्हटले आहे की, जे लोक स्मार्टफोनचा सातत्याने, प्रदीर्घ वेळेपर्यंत वापर करतात, त्यांच्या मेंदूत ट्यूमर होण्याचा धोका सर्वाधिक असतो. शरीराच्या तुलनेत मेंदूच्या आकाराचा निकष समोर ठेवला तर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्याच्या मेंदूचा आकार अधिक मोठा असतो, असेही यात आढळून आले आहे. हत्तीचा मेंदू त्याच्या शरीराच्या तुलनेत केवळ 0.15 टक्के इतकाच असतो. त्या तुलनेत मनुष्याच्या मेंदूचा आकार मात्र त्याच्या शरीराच्या तुलनेत 2 टक्के इतका असतो.
या संशोधनात पुढे असे नमूद आहे की, आपण जर असे मानले की, आपण पुरेशी व उत्तम झोप घेतली आहे तर आपला मेंदूदेखील ती बाब सहजपणे स्वीकारतो. आपल्या मेंदूत ऐमिग्डाल नावाचा एक हिस्सा असतो. तो मेंदूतून बाहेर केल्यास आपल्या मेंदूतील कोणत्याही गोष्टीची किंवा घटकाची असणारी भीती किंवा धास्ती कायमची निघून जाते. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या मेंदूतील अर्धा हिस्सा शस्त्रक्रिया करून काढून टाकला जाऊ शकतो आणि याचा आपल्या स्मरणशक्तीवर किंचितही फरक पडणार नाही!