ललितकलांच्या आस्वादाने सर्वोच्च आनंद प्राप्ती:विदुषी आशा खाडीलकर यांचे प्रतिपादन
3 days ago
2
जगातला सर्वोच्च आनंद ललितकलांच्या आस्वादाने मिळतो. अशा आनंदाची प्रचीती घेण्याची वृत्ती, संधी, ऊर्जा ईश्वरकृपेने मला मिळाली. यापुढेही कलानंद देणे आणि घेणे, हा प्रवास सुरू राहो, हीच प्रार्थना, असे भावपूर्ण मनोगत ज्येष्ठ गायिका विदुषी आशा खाडीलकर यांनी व्यक्त केले. 'विदुषी वीणाताई सहस्रबुद्धे यांच्या नावाने मानपत्र मिळाल्याचा विशेष आनंद वाटतो', असेही त्या म्हणाल्या. ख्यातनाम गायिका, संगीतकार डॉ वीणा सहस्रबुद्धे यांचे शिष्य आणि प्रसिद्ध गायक अतुल खांडेकर यांच्या सूर महती फाउंडेशनच्या वतीने आयोजित सूर महती महोत्सवात विदुषी आशा खाडिलकर यांना संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ कारकीर्दीबद्द सन्मानित करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांना सांगीतिक आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने आयोजित हा दोन दिवसीय महोत्सव कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाला. फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल खांडेकर, भक्ती खांडेकर आणि ज्येष्ठ गायिका तसेच संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका अभिनेत्री निर्मला गोगटे यावेळी उपस्थित होते. आशा खाडीलकर यांनी याप्रसंगी वीणाताई, बोडस कुटुंबीय आणि स्वतःचे नाते उलगडले. कलेवर आत्यंतिक प्रेम करणारी संगीताची विद्यार्थिनी, एक कलासाधिका म्हणून मी वीणाताई आणि त्यांचे पती हरी सहस्रबुद्धे यांना वंदन करते. वीणाताई नात्याने माझी बहीण होती. तिचे वडील पं. शंकरराव बोडस आणि माझे वडील ही आतेमामे भावंडे होती. देशाची फाळणी झाली, तेव्हा हे कुटुंब कराची येथे होते. नंतर ते कानपूर येथे स्थायिक झाले. पण सांगलीला आमच्या घरी ते नेहमी येत तेव्हा वयाने अगदीच छोटी असलेल्या मला शंकरकाका, काशिनाथदादा आवर्जून बंदिशी शिकवत असत. मला लहानपणापासून संगीताची प्रचंड ओढ होती. छायानट, चंद्रकंस, मधुवंती रागांतील बंदिशी मला त्यांनी शिकवल्या. वीणाताई गात असत, ती 'मतवारो बादल आयो' ही रचनाही मला काशिनाथदादांनी शिकवली होती. शंकरदादांनीही अप्रतिम रचना शिकवल्या. आम्ही सतत गाण्याच्या वातावरणात असायचो. सुदैवाने लग्नाआधी आणि नंतरही मला समृद्ध आयुष्य लाभले. त्यामुळे संगीत, साहित्य, अभिनय या आवडी जपता आल्या आणि जगणे समृद्ध झाले, अशी भावना आशाताईंनी व्यक्त केली. विदुषी निर्मला गोगटे म्हणाल्या, सूरमहती फाऊंडेशन हे नाव अन्वर्थक आहे. वीणाताई अखंड सुरांचा विचार करत. बारा सुरांतले षड्जाचे अस्तित्व प्रत्येक सुरात प्रतीत होणं म्हणजे सुरेल असणं, वीणाताई अशा सुरेल होत्या. त्या आदर्श गुरू होत्या. त्यांचा शिष्य म्हणून अतुलने डोळस विद्या ग्रहण केली आहे. गोविंदराव टेंबे म्हणत असत, की, इतर कला शिकलात तर सौंदर्यदृष्टी येते, पण संगीत शिकलात की, वृत्तीच सौंदर्यमय होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)