विधानसभा निवडणुकीआधी महायुतीला खिंडार:पहिला मित्रपक्ष पडला बाहेर, महादेव जानकरांचा स्वबळावर लढण्याचा निर्णय

2 days ago 3
विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या रुपाने महायुतीमधून पहिला मित्रपक्ष बाहेर पडला आहे. महायुतीमधून बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर यांचा पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. जातीय समीकरणांचा विचार करता भाजपला महादेव जानकर यांची मनधरणी करण्यात यश येते का? ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. आमदारकीची टर्म पुन्हा न मिळाल्यामुळे देखील नाराज असल्याचे बोलले जात होते. याशिवाय जानकर यांनी आपल्या पक्षासाठी महायुतीकडे 40 ते 50 जागांची मागणी केली होती. मात्र त्यांना महायुतीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीला रामराम ठोकल्यानंतर महादेव जानकर यांचा पक्ष किती जागांवर उमेदवार उभे करणार तसेच भाजप आणि महायुतीकडून त्यांची नाराजी दूर केली जाणार की नाही, हे पहावे लागणार आहे. लोकसभेला झाला होता पराभव लोकसभा निवडणुकीतही महायुतीने महादेव जानकर यांना एक जागा सोडली होती. जानकर यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. लोकसभा निवडणुकीवेळीही महादेव जानकर महाविकासआघाडीसोबत जायच्या तयारीत होते, यासाठी त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चाही सुरू होती, पण शेवटच्या क्षणी महादेव जानकर यांनी महायुतीसोबत जायचा निर्णय घेतला होता. जानकरांची मोठी ताकद महादेव जानकर यांना धनगर समाजाचा मोठा पाठिंबा आहे. महादेव जानकर यांच्या पक्षाची सोलापूर, बारामती, परभणी, बीड, जालना आणि कर्नाटक लगतच्या प्रदेशात मोठी ताकद आहे. धनगर समाजाची संख्या जास्त असलेल्या मतदारसंघात महादेव जानकरांच्या पक्षाला चांगला पाठिंबा आहे. त्यामुळे जानकर यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देणे हे महायुतीसाठी डोकेदुखी ठरु शकते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article