विधानसभेचा निकाल लागण्यापूर्वी तोंड बंद ठेवा:मविआच्या नेत्यांना बंद दाराआड सल्ला, मुंबईतील मविआच्या बैठकीत राऊत, पटोलेंना सूचक इशारा
5 hours ago
1
विधानसभेचे एक्झिट पोल जाहीर होताच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून हालचाली सुरू झाल्या. त्यासोबतच घटक पक्षांतील नेत्यांनी एकमेकांविरुद्ध टीकाही केली. त्यामुळे मविआची बैठक मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात बंद दाराआड घेण्यात आली. त्यात मविआचे प्रमुख नेते विशेषत: उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निकालापूर्वी तोंड बंद ठेवण्यास सांगण्यात आले. सूत्रांनी सांगितले की, मविआतील नेत्यांनी आपसातील वाद चव्हाट्यावर आणून दाखवू नये, मुख्यमंत्रिपदाचा तुमचा उमेदवार कोण, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला तर त्याला शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) उत्तर देऊ नये, असे सांगण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांना कसे सुरक्षित ठेवता येईल यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सतेज ऊर्फ बंटी पाटील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उद्धवसेनेचे संजय राऊत यांनी काही सूचना केल्या. तब्बल १ तास १५ मिनिटांच्या बैठकीमध्ये निकालानंतर आमदार पळवापळवीच्या धोक्यासंदर्भात चर्चा झाली. २३ नोव्हेंबर रोजीच आमदारांना मुंबईत दाखल होण्याची सूचना मविआतील पक्षनेतृत्वाकडून देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, तसे काही झाले नाही. सर्वच आमदारांना एकत्र ठेवायचे की वेगवेगळे यावरही बरीच खलबते झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्नाटकातून रसदीची शक्यता या बैठकीस उपस्थित नेत्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, मुंबईमध्ये उद्धवसेनेकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असतील तर पैसा खर्चण्याचीही तयारी आहे. त्यामुळे मुंबईमध्ये अपक्ष आमदारांच्या निवासाची आणि इतर व्यवस्था करणे सहज शक्य आहे. मात्र, उद्धव ठाकरेंचे नाव स्पर्धेतून मागे पडले तर मुंबईतून उमेदवारांना दुसऱ्या राज्यात नेले जाणार आहे. हिमाचल प्रदेशला त्यांना न्यावे लागले तर विमान आणि इतर व्यवस्थेसाठी कर्नाटकातून रसद पुरवठा करण्याची तयारी काँग्रेसकडून शुक्रवारी सायंकाळपर्यंत केली जाईल. महायुतीप्रमाणे मविआने अपक्षांसाठी साम, दाम, दंड, भेद वापरण्याची सूचना एक्झिट पोलमध्ये महायुती - महाविकास आघाडीमध्ये काट्याची टक्कर दाखवण्यात आली आहे. त्यामुळे महायुती या वेळी निकालामध्ये सत्तास्थापनेच्या जादुई आकड्यापर्यंत पोहोचू शकली नाही तर महाविकास आघाडीच्या आमदारांची पळवापळवी होऊ शकेल. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांना एकसंघ ठेवण्यासाठी राज्यात विभागनिहाय नेत्यांना जबाबदारी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. निवडून येणाऱ्या अपक्षांसोबत तिन्ही पक्षांचे नेते बोलतील. एक्झिट पोलमध्ये २० अपक्ष निवडून येतील, असे म्हटले आहे. या अपक्षांना महायुती साम, दाम, दंड आणि भेद या मार्गाने गळाला लावण्याचा प्रयत्न करणार आहे. हे लक्षात घेऊन महाविकास आघाडीनेही त्याच दिशेने प्रयत्न करावेत, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. काही प्रबळ अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधून त्यांच्या आशा-अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. त्यापैकी काही जणांशी शुक्रवारी पुन्हा संपर्क साधला जाणार असल्याची माहिती एका नेत्याने दिली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)