Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत झाली होती. या लढतीत महायुतीला एकमत मिळाले तर महाविकासआघाडीचा सुपडासाफ केला आहे. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. सध्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच आता अजित पवारांच्या जवळच्या नेत्याने एक मोठे विधान केले आहे.
महायुतीला विधानसभेत यश मिळाल्यानतंर आता तिन्ही घटक पक्षांकडून सातत्याने आपपल्या नेत्यांची नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केली जात आहेत. भाजपचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत. तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असा दावा केला जात आहे. तसेच अजित पवार गटानेही मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे नेमका कोणाचा मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी एक मोठा दावा केला आहे. अजित पवार आणि शरद पवार कधीही एकत्र येऊ शकतात, असे विधान नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.
“दादांना एकदा मुख्यमंत्रीपद द्यावं”
नरहरी झिरवाळ यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावेत का याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले, “अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा किंवा अपेक्षा म्हणण्यापेक्षा जनतेचीही इच्छा आहे. परंतू शेवटी हे महायुतीचे नेते आहेत. त्यात मग पंतप्रधान मोदी, अमित शाह हे बसून जो काही निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य करावा लागेल. पण माझी विनंती आहे की, दादांना एकदा मुख्यमंत्रीपद द्यावं, अशी माझी इच्छा आहे”, असे नरहरी झिरवाळ म्हणाले.
“राजकारणात काहीही होऊ शकतं”
“मी दररोज मंत्रालयात जात असतो. त्यामुळे आता मलाही कोणतंही एखादं मंत्रीपद दिलं तरी चालेल, पण द्यावं ही विनंती. शरद पवार अजित पवार कधीही एकत्र येऊ शकतात. राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात कोण कोणाचा शत्रू मित्र या गोष्टी सुरुच असतात”, असेही नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.