लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी 95 वर्षीय योद्धा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा फुले वाडा येथे गुरुवारपासून आत्मक्लेश उपोषण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘दै. सामना’चा अंक आणि त्यामध्ये आलेली बातमी बाबा आढाव यांना वाचून दाखवली.
विधानसभा निवडणुकीत पैशांचा पूर आला. पैसे वाटपाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. यंत्रणा हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी संसदीय लोकशाहीची हत्या केली. या निकालाच्या निषेधार्थ ज्येष्ठ कामगार नेते, सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे पुण्यातील फुले वाड्यात आत्मक्लेश उपोषण सुरू आहे. शनिवारी सकाळी शरद पवार यांनी आंदोलन स्थळी जाऊन डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. शरद पवार यांनी डॉ.बाबा आढाव यांना ‘दै. सामना’चा अंक वाचून दाखवला. यावेळी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात अशी मागणी डॉ.बाबा आढाव यांनी केली.
डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनीही माध्यमांशी संवाद साधला. मतदानाच्या दिवशी शेवटच्या दोन तासात वाढलेली आकडेवारी ही धक्कादायक आहे. संसदीय लोकशाहीवर राज्यकर्ते आघात करत आहेत. पैशाचा वापर करून निवडणूक यंत्रणा हातात घेतली, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली.
शेवटच्या तासात वाढलेली मतदानाची टक्केवारी धक्कादायक, शरद पवार यांचे विधान