शारदीय संगीत महोत्सव 3 ऑक्टोबरपासून:संभाजीनगरकरांना नऊ दिवस मिळणार सुरेल मेजवानी

2 hours ago 1
छत्रपती संभाजीनगरासह मराठवाड्यातील सांस्कृतिक-सांगीतिक क्षेत्रात लक्षणीय ठसा उमटवणारा शारदीय संगीत महोत्सव 3 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. ह्या नवरात्र महोत्सवाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. दर वर्षी नऊ दिवस चालणाऱ्या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत महोत्सवात गेल्या 24 वर्षांमध्ये देशातील अनेक नामांकित आणि उदयोन्मुख कलाकारांनी हजेरी लावली आहे. संगीत रसिकांसाठी एक उत्तम पर्वणी असलेल्या या संगीत महोत्सवाचे उद्घाटन दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी सात वाजता छत्रपती संभाजीनगरच्या रामकृष्ण मिशन आश्रमाचे प्रमुख स्वामी विष्णुपादानंद महाराज यांच्या हस्ते होईल. दररोज संध्याकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या महोत्सवात विदुषी शुभदा पराडकर, पं. विश्वनाथ ओक, पं. हेमंत पेंडसे, पं. दिलीप काळे, पं. शशांक मक्तेदार, रसिका एकबोटे, सुधाकर तळणीकर, पं. कल्याण अपार ह्या ज्येष्ठ कलाकारांसोबतच प्रज्ञा देशमुख, आसावरी वाईकर, अभिमन्यू हेरलेकर, अदिती कोरटकर, बंकट बैरागी असे नावाजलेले कलाकार व आलम बंधू, प्रबोध जोशी, अदिती ताता, स्वरित केचे, अनहद वारसी हे उदयोन्मुख कलाकार आमंत्रित आहेत. साथ संगत करण्यासाठी दत्ता गोगटे, शोण पाटील, मंगेश कुलकर्णी, जगमित्र लिंगाडे, जयंत नेरळकर, दिलीप दोडके, गजानन केचे, विनायक पांडे, दिनेश डोळे आदी प्रतिथयश तबला व संवादिनी वादक असतील. एकंदरित संगीत रसिकांसाठी विशेष पर्वणी असलेल्या या कार्यक्रमांचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सर्वांसाठी खुला असणारा हा महोत्सव शहरातील नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे ह्यांच्या निवासस्थानी - 'दीपश्री', 28 - 29, भाग्यनगर, जुन्या हेडगेवार रुग्णालयामागे, या ठिकाणी होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article