शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी नवनिर्वाचित आ. विनय कोरे यांना प्रमाणपत्र प्रदान केले.
Published on
:
24 Nov 2024, 12:59 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:59 am
सरूड/बांबवडे : शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात महायुती पुरस्कृत जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांनी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मविआ पुरस्कृत शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर यांचा 36,833 हजार मतांनी धुव्वा उडविला. आ. कोरे यांनी सलग दुसर्यांदा विजय मिळवून मतदारसंघाची सन 2000 नंतर आलटून पालटून आमदार देण्याची परंपरा खंडित केली आहे. याआधी (स्व.)आ. संजयसिंह गायकवाड यांनी ही किमया साधली होती. निकालानंतर आ. कोरे समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत विजयाचा जोरदार जल्लोष केला.
मनसेकडून डॉ. भारत देवळेकर, बसपाकडून शामला सरदेसाई, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सत्यजित पाटील-सरुडकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अभिषेक पाटील, संभाजी बि—गेड पार्टीकडून आनंदराव सरनाईक, कामगार किसान पार्टीकडून संतोष खोत, महायुतीकडून जनसुराज्य शक्तीचे डॉ. विनय कोरे यांच्यासह अपक्ष म्हणून अॅड. दिनकर घोडे, धनाजी गुरव, विनय कोरगावकर, विनय चव्हाण, सत्यजित पाटील, सत्यजित विलासराव पाटील, संभाजी कांबळे असे एकूण 14 उमेदवार रिंगणात होते. मात्र, विद्यमान आमदार कोरे आणि माजी आमदार सरूडकर यांच्यातच खरी लढत झाली. मतदानानंतर दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केला गेला. विनय कोरेंनी सत्यजित पाटील यांच्या होमपिचवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या हुकमी मतांचा आकडा कमी करण्यासाठी ‘सारे कसब’ पणाला लावले होते. याउलट सत्यजित पाटील यांनी पन्हाळा तालुक्यातील कोरेंच्या व्होट बँकेला हादरा देण्याची रणनीती आखली होती. शेवटी या संघर्षात विनय कोरे हे सरूडकरांना शाहूवाडीतच पुरते जखडून यशस्वी झाले.‘वारणा समूहावर टीका करणार्या विरोधकांनी स्वतः च्या गावात एखादे गुर्हाळ तरी उभे केले का?’, ‘ग्लुकोज कारखान्याच्या नावाखाली गोळा केलेल्या शेअर्सच्या पैशाचं काय झालं?’ हे विनय कोरेंनी उचललेले मुद्दे शाहूवाडी-पन्हाळ्यातील मतदारांना भावल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. शाहूवाडी तहसील कार्यालय शेजारच्या जुन्या शासकीय धान्य गोदामात मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
सुरुवातीला शाहूवाडीच्या पश्चिम भागातून मतमोजणी सुरू झाली. पहिल्याच फेरीत आ. कोरे यांनी 20 मतांची आघाडी घेतली. दुसर्या फेरीत सत्यजित पाटील यांनी बाजी मारत 492 मताधिक्य घेतले. त्यांची ही आघाडी चौथ्या फेरीअखेर 1655 पर्यंत पोहोचली. सहाव्या फेरीत ती 680 पर्यंत खाली आली. आठव्या फेरीत विनय कोरे पुन्हा 108 मतांनी आघाडीवर आले. तर 11 आणि बाराव्या फेरीत सत्यजित पाटील हे अनुक्रमे 3 हजार 714 आणि 3 हजार 606 मतांनी कोरेंच्या पुढे गेले. मात्र, मतमोजणी पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम सीमेवर पोहोचत असताना सरूडकरांसाठी सदरचे मताधिक्य पुरेसे नव्हते, त्यामुळे सरूडकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसत होता. त्याचवेळी कोरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आशा आणि उत्सुकता वाढत निघाली होती.
आ. कोरे यांनी 15 व्या फेरीत जोरदार मुसंडी मारत मताधिक्याकडे वाटचाल सुरू खेळू. कोरेंचे 2 हजार 981 पासून वाढणारे मताधिक्य 16 व्या फेरीत 6933, 17 व्या फेरीत 12 हजार 679, 18 व्या फेरीत 16 हजार 748, 19 व्या फेरीत 22 हजार 599, 20 व्या फेरीत 27 हजार 206, 21 व्या फेरीत 29 हजार 034, 22 व्या फेरीत 30 हजार 281, 23 व्या फेरीत 32 हजार 818, 24 व्या फेरीत 34 हजार 343 आणि अंतिम 25 व्या फेरीत तब्बल 35 हजार 681 मतांची आघाडी घेत. सरूडकरांचा दारुण पराभव केला. मतमोजणी केंद्रात आकडेमोड करणारे सरूडकरांचे प्रतिनिधी हताशपणे निघून गेले. तर आ. कोरे यांचे दुसर्या, तिसर्या फळीतील कार्यकर्ते, समर्थकांनी मतमोजणीस्थळी जत्थ्याने दाखल मोठा जल्लोष करायला सुरुवात केली. यामध्ये जनसुराज्य पक्षाचा ध्वज उंचावून आ. कोरेंच्या विजयाच्या घोषणा देत या गुलालात न्हाऊन गेलेल्या कार्यकर्त्यांनी आसमंत दुमदुमून सोडला होता.
शाहूवाडी मतदार संघात पुरुष 157316, महिला 148923 व इतर 7 असे एकूण 306246 मतदारांपैकी पुरुष 125620 (79.85 टक्के) महिला 116363 (78.14 टक्के) व इतर 4 (57.14 टक्के) अशा एकूण 2,41,987 (79.02 टक्के) मतदारांनी हक्क बजावला होता.
उमेदवार निहाय मिळालेली मते (कंसात पक्ष)
डॉ. विनय विलासराव कोरे (जनसुराज्य शक्ती) : 1 लाख 36 हजार 64, 2) सत्यजित बाबासाहेब पाटील-सरूडकर (शिवसेना उबाठा पक्ष) : 1 लाख 011 3) सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) : 994, 4) विनय व्ही. कोरगांवकर : 938, 5) अभिषेक सुरेश पाटील (रासपा) : 777, 6) डॉ. दिनकर गणपती घोडे (अपक्ष) : 742 7) सत्यजित विलासराव पाटील (अपक्ष) : 741, 8) धनाजी जगन्नाथ गुरव : 710, 9) डॉ. भरत कासम देवळेकर (मनसे) : 693, 10) संतोष केरबा खोत (कामगार किसान पार्टी) : 531, 11) आनंदराव वसंतराव सरनाईक (संभाजी बि—गेड पार्टी) : 492, 12) शामला उत्तमकुमार सरदेसाई (बसपा) : 483, 13) विनय व्ही. चव्हाण (अपक्ष) : 334, 14) संभाजी सीताराम कांबळे (अपक्ष) : 268,