शिक्षण मंचाला मोठा धक्का:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांना अखेर पद सोडण्याचे आदेश

2 hours ago 1
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अनेक गंभीर प्रसंगांमधून सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे नुकतेच निधन झाले. कुलगुरूंच्या निधनानंतर विद्यापीठातील प्र- कुलगुरू पदाचा कार्यकाळ संपुष्टात येत असतो. कुलगुरू चौधरी यांचे दोनदा निलंबन झाले आहे. मात्र निलंबनानंतरही विद्यापीठातील प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे यांचे पद कायम होते. मात्र कुलगुरूंच्या निधनामुळे त्यांना आता आपले पद सोडावे लागणार आहे. विशेष म्हणजे राज्यपालांनी तसे पत्र काढून त्यांना पद सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी रात्री तसे पत्र विद्यापीठाला देण्यात आले. विद्यापीठ शिक्षण मंचासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विद्यापीठातील कुठल्याही मोठ्या पदावर आता त्यांच्या गटातील अधिकारी नाही. तत्कालीन कुलगुरू दिवंगत डॉ. सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीनंतर कायद्याचे कलम ६ नुसार कुलपतींनी कुलगुरूंशी विचारविनिमय करून विद्यापीठासाठी प्र-कुलगुरू म्हणून डॉ. संजय दुधे यांची नियुक्ती केली होती. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या कलम 13 उपकलम 7 नुसार प्र-कुलगुरूंचा पदावधी (कार्यकाळ) कुलगुरूंच्या पदाच्या अवधीबरोबरच किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण करेपर्यंत जे लवकर घडेल तेव्हा समाप्त होतो. दिवंगत कुलगुरू डॉ. चौधरी यांचे 26 सप्टेंबरला निधन झाले. त्याच दिवशी प्र-कुलगुरू म्हणून कार्यकाळ नैसर्गिकपणे संपला. त्यामुळे कायद्याचे तंतोतंत पालन करून प्र-कुलगुरूंचा कार्यकाळ संपुष्टात आल्याचे परिपत्रक जाहीर करावे, अशी मागणी अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी प्रभारी कुलगुरूंकडे केली होती. वादग्रस्त निवड माजी कुलगुरू डॉ. काणे यांनी कुलसचिव पदासाठी गुणवत्तेच्या निकषावर अपात्र ठरवलेल्या डॉ. संजय दुधे यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदावर ऑक्टोबर 2020 मध्ये नियुक्ती झाली होती. विद्यापीठ वर्तुळातील अनेक दिग्गजांना डावलून डॉ. दुधेंची निवड झाल्याने गुणवत्ता, पात्रता या निकषांऐवजी विशिष्ट विचारांची बांधीलकी व शिक्षण मंचाची निष्ठा सरस ठरल्याची चर्चा होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article