श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्या एनपीपी पक्षाने संसदीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.(Image source - X)
Published on
:
15 Nov 2024, 8:06 am
Updated on
:
15 Nov 2024, 8:06 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके (Sri Lankan President Anura Kumara Dissanayake) यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) पक्षाने संसदीय निवडणुकीत (Sri Lanka Election Results) दणदणीत विजय मिळवला आहे. श्रीलंका निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, २२५ सदस्यीय विधानसभेत अनुरा कुमारा दिसानायके यांच्या डाव्या आघाडीने किमान १२३ जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. सुरुवातीच्या कलानुसार, एनपीपी पक्षाच्या युतीला तीन चतुर्थांश मतपत्रिकांच्या मोजणीतून एकूण ६२ टक्के मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी सजिथ प्रेमदासा यांच्या पक्षाला केवळ १८ टक्के मते मिळाली.
एनपीपी पक्षाच्या यापूर्वी संसदेत केवळ तीन जागा होत्या. यामुळे त्यांनी संसद विसर्जित करण्याचा आणि नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. दिसानायके यांना मार्क्सवादी म्हणून ओळखले जाते. त्यांची सप्टेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे आश्वासन दिले आहे. "लोकांनी भ्रष्टाचार आणि भ्रष्ट यंत्रणेपासून मुक्ती मिळवण्यासाठी मतदान केले," असे आयटी प्रोफेशनल चनाका राजपक्षे यांनी यांनी शुक्रवारी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. चनाका राजपक्षे यांनी निवडणुकीत एनपीपीला पाठिंबा दिला आहे.
श्रीलंकेसाठी एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉईंट
दिसनायके यांना विजयाची खात्री होती. "आम्ही हा विजय श्रीलंकेसाठी एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉईंट म्हणून पाहात आहोत. आम्हाला संसदेत एक मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी जनादेश अपेक्षित होता. आम्हाला विश्वास आहे की जनता आम्हाला हा जनादेश देईल," असे त्यांनी गुरुवारी मतदान केल्यानंतर सांगितले होते. "श्रीलंकेत सप्टेंबरमध्ये राजकीय परिवर्तन सुरु झाले होते, जे कायम राहिले पाहिजे." असेही त्यांनी नमूद केले.
निवडणुकीत कोणते मुद्दे ठरले महत्त्वाचे?
दिसानायके यांच्या NPP पक्षाची स्थापना २०१९ मध्ये झाली होती. त्यांनी श्रीलंकेतील कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेनंतर गरिबी निर्मुलनासाठी आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्याच्या दिशेने पावले उचलत दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेत (Sri Lanka Crisis) आर्थिक संकटामुळे अराजकता माजल्यानंतर २०२२ मध्ये माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना पदाचा राजीनामा दिला होता.