'सत्ता'कारण:विदर्भातील नव्या काँग्रेस आमदारांना वडेट्टीवार परराज्यात घेऊन जाणार
6 hours ago
1
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान झाले. काँग्रेसला विदर्भात मोठ्या विजयाचा विश्वास आहे. येथील ६२ जागांपैकी ३५ ते ४० जागा मिळतील, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. त्यामुळे मतदान होताच नियोजन सुरू झाले आहे. मतदानाचा टक्का वाढल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर पूर्व विदर्भातील आमदारांच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या आमदाराशी दगाफटका होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. २३ नोव्हेंबरला निकाल येताच आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्यावरच सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर लगेच ‘एक्झिट पोल्स’चे अंदाज यायला सुरुवात झाली. जवळपास सर्वच पोल्सनी महायुतीची सत्ता पुन्हा येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. महाविकास आघाडीही बहुमतापासून किंचित लांब असल्याचे दिसते आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरच निकालाचे खरे चित्र समजू शकेल. मात्र तत्पूर्वी ‘एक्झिट पोल्स’नी पक्षनिहाय जे अंदाज व्यक्त केले आहेत, त्यावरून काँग्रेस तयारीला लागली आहे. नागपुरात विशेष विमान सज्ज असेल : भाजपकडून होणाऱ्या फोडाफोडीचा इतिहास पाहता काँग्रेस कुठलाही धोका पत्करण्यास तयार नाही. त्यासाठी पावले टाकली जात आहेत. आमदारांना सुरक्षित स्थळी तातडीने नेण्यासाठी विशेष विमान नागपुरात सज्ज ठेवण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. एकनाथ शिंदेंनीही नियुक्त केला विश्वासू नेता मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत दिसणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी आपल्या विश्वासू नेत्यांवर सोपवली. दुसरीकडे फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप नेते सक्रिय झाले आहेत! फडणवीसांनी पालघर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आपल्या जवळच्या नेत्यांना सक्रिय केले आहे. त्यांच्यावर भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष आमदार जमवाजमवीची जबाबदारी देण्यात आली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)