बंगळूर : जप्त केलेल्या गांजाची माहिती पत्रकारांना देताना पोलिस आयुक्त बी. दयानंद. शेजारी इतर अधिकारी.File Photo
Published on
:
22 Nov 2024, 11:59 pm
Updated on
:
22 Nov 2024, 11:59 pm
बंगळूर : नववर्ष साजरे करण्यासाठी अनेकांकडून पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ मागवण्यात येत असून त्याचा साठा केला जात आहे. अशा प्रयत्नात असणार्या गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी सीसीबी पोलिसांनी छापा सत्र सुरू केले आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत 6.25 कोटींचे अमली पदार्थ आणि गांजा जप्त केला. या प्रकरणात दोन विदेशी नागरिकांसह पाचजणांना अटक केली.
सोलदेवनहळ्ळीतील पुट्टस्वामी ले-आऊट येथे 20 नोव्हेंबर रोजी अमली पदार्थ विकण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. दोघा विदेशी नागरिकांना अटक करुन त्यांच्याकडून एमडीएमए क्रिस्टल्स, कोकेन, एक्स्टेसी पिल्स असे तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अटक केलेल्या विदेशी नागरिकांची चौकशी केल्यानंतर ते गेल्या 5 वर्षांपासून वैद्यकीय व्हिसा मिळवून भारतात आल्याची माहिती उघड झाली. दक्षिण आफ्रिकन ड्रग पेडलरची ओळख झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडून कमी दरात अमली पदार्थ घेऊन त्याची विक्री सुरु केली. एक ग्रॅम अमली पदार्थ 12 ते 15 हजार रुपयांना ते विकत होते. आयटी, बीटी कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या संपर्कात ते होते.
आणखी एका प्रकरणामध्ये कारमधून नेण्यात येणारा 3.25 कोटींचा 318 किलो गांजा पकडण्यात आला. गोविंदपूर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली. जक्कूरमधील श्रीरामपुरातील रेश्मा (28), जमीर खान (29) आणि केरळमधील कोट्टायममधील अच्चू संतोष (28) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोविंदपुरातील एचबीआर लेआऊटमध्ये अटक केलेल्या संशयितांकडून कारमधून गांजा विक्री केली जात असल्याची माहिती उघड झाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
आंध्र, ओडिशातून गांजा मागवला
ओडिशा आणि आंध्र प्रदेश येथून कमी दरात गांजा आणण्यात येत होता. बंगळूरसह आसपासच्या परिसरात त्याची विक्री केली जात होती. संशयितांकडून 318 किलो गांजासह कार, 3 मोबाईल असा 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.