Published on
:
24 Nov 2024, 1:28 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:28 am
कोल्हापूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या करवीरमध्ये शिंदे शिवसेनेचा भगवा फडकावून चंद्रदीप नरके यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढला आहे. या मतदारसंघाचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाने तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेतही चंद्रदीप नरके यांनी अक्षरश: वादळात दिवा लावण्याचे काम केले आहे. सहानुभूती असताना व साखर कारखान्याची ताकद, पारंपरिक विरोधकांचे सहकार्य मिळूनही राहुल पाटील यांना यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा गटाची फेरबांधणी करावी लागेल, त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गटाला ताकद द्यावी लागेल, तेव्हाच गट कायम राहील.
मुळात काँग्रेसच्या या गडावर दोन टर्म शेतकरी कामगार पक्ष व दोन टर्म शिवसेनेने आपले झेंडे फडकविले आहेत. आता काँग्रेसचा झेंडा उतरवून नरके यांनी शिंदे शिवसेनेचा झेंडा फडकविला आहे. पी. एन. पाटील यांचे अकाली निधन झाल्यामुळे मतदारसंघात सहानुभूतीची लाट होती, असे असूनही चंद्रदीप नरके यांनी येथे विजय मिळवत पराभवाचा वचपा काढला आहे. खरं तर नरके यांचे घराणे काँग्रेसचे पण पी. एन. पाटील यांच्यामुळे काँग्रेसमध्ये स्थान मिळणार नाही म्हणून ते शिवसेनेत गेले. 2009 आणि 2014 मध्ये त्यांनी पी. एन. पाटील यांचा पराभव केला. 2014 ची निवडणूक एवढी चुरशीची झाली की नरके फक्त 710 मतांनी निवडून आले.
2019 मध्ये दोन वेळच्या पराभवाचा वचपा काढून पी. एन. पाटील निवडून आले. मात्र, मुदत संपण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट होती. मात्र, तरीही राहुल पाटील यांना विजय मिळविता आला नाही. पी. एन. यांच्या नेतृत्वाची पोकळी होती. कार्यकर्त्यांमध्ये आधार देणारे कोणी नव्हते, त्यातच करवीर मतदारसंघाला लागून असलेल्या कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेताना काँग्रेसमध्ये जो गोंधळ झाला तो लोकांना आवडला नाही, या सार्याचा फटका तेथे काँग्रेसला बसला. चंद्रदीप नरके यांनी कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून विधानसभेची तयारी सुरू केली होती. ते शिंदे शिवसेनेचे उमेदवार होते. महायुतीचे घटक होते. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षातील संताजी घोरपडे यांनी बंडखोरी केली होती. त्याचा फटका नरके यांना बसणार, अशी चर्चा होती. त्यातच घोरपडे यांच्यावर हल्ला झाला. मात्र, या कशाचाही परिणाम होऊ न देता नरके यांनी केवळ प्रचारावरच लक्ष केंद्रित केले.