सांगली ः मार्केट यार्डातील तासगाव अर्बन बँकेतील चोरीप्रकरणी एकाला एलसीबीने अटक केली(छाया ः सचिन सुतार)
Published on
:
29 Nov 2024, 1:38 am
Updated on
:
29 Nov 2024, 1:38 am
सांगली ः येथील मार्केट यार्डातील तासगाव अर्बन बँकेतील चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. या चोरीप्रकरणी एकाला अटक करण्यात आली, तर दोघेजण पसार झाले आहेत. यात कराड (जि. सातारा) येथील एका चोरट्याचा समावेश आहे. अटक केलेल्या चोरट्याकडून कोयता, चाकू, लोखंडी कटावणी जप्त करण्यात आली.
ओंकार विशाल साळुंखे (वय 19, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, जुना बुधगाव रोड, सांगली), सुदर्शन यादव (रा. कराड, जि. सातारा, सध्या रा. विश्रामबाग) आणि मुनीब ऊर्फ बाबू भाटकर (रा. आंबा चौक, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. यातील ओंकार साळुंखे याला अटक करण्यात आली आहे.
मार्केट यार्डातील सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या इमारतीत तासगाव अर्बन बँकेची शाखा आहे. मंगळवारी रात्री दोघेजण बँकेत शिरले. चोरट्यांनी आधी दरवाजावरील अलार्मची वायर कापली. त्यानंतर सीसीटीव्ही वळविले. बँकेतील स्ट्राँग रुम फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ती फोडता आली नाही. दोघांनी तिसर्या साथीदारालाही बँकेत बोलाविले. त्यानेही स्ट्राँग रुम फोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. अलार्मची वायर कापल्यानंतर त्याचा अलर्ट मेसेज बँकेच्या अधिकार्यांना गेला. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलिसांना घटनेची माहिती दिली. विश्रामबाग व एलसीबीच्या पथकाने मध्यरात्री मार्केट यार्डात धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. पोलिसांनी बँकेसह आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी विशेष पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकामधील अनिल कोळेकर व विक्रम खोत यांना सुदर्शन यादव, ओंकार साळुंखे व मुनीब भाटकर या तिघांनी बँक फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. तिघेही मीरा हाऊसिंग सोसायटीलगत तात्यासाहेब मळ्यात लपल्याचे समजताच एलसीबीचे पथकाने तातडीने धाव घेतली.
तात्यासाहेब मळा येथील निकुंज लॉनच्या भिंतीलगत ओंकार साळुंखे थांबला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सॅकची तपासणी केली. त्याच्याकडून धारदार चाकू, कोयता, कटावणी, मारतूल आदी साहित्य मिळून आले. त्याने यादव व भाटकर याच्या मदतीने बँकेचे कुलूप कटावणीने तोडून चोरी करत असताना सायरन वाजल्याने पळून गेल्याची कबुली दिली. संशयितांसह मुद्देमाल विश्रामबाग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. उर्वरित दोन चोरटे पसार झाले असून त्यांच्या शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.