Published on
:
29 Nov 2024, 3:30 am
Updated on
:
29 Nov 2024, 3:30 am
शालेय वयात झालेली मारहाण, कुटुंबाला गाव सोडण्याची आलेली वेळ यातून एका युवकाच्या मनात राग, द्वेष स्वदवद होता. या रागातूनच त्याने गावातील प्रतिष्ठित व्यक्तीवर कोयत्याने वार केला, पण जमावाने त्याला पकडून बेदम मारहाण केली. यात युवकाचाच मृत्यू झाला. रागाच्या भरात केलेल्या कृत्याने युवकालाच स्वतःचा जीव गमावावा लागला. हो त्याचीच कहाणी...
कवलापूर... मिरज तालुक्यांतील सधन गाव... सिद्धेश्वर यात्रेसाठी गाव प्रसिद्ध. गावातील लोकही गुण्यागोविंदाने राहतात. तसं गाव राजकीय, सामाजिकदृष्ट्या संवेदनशील, शेती मुख्य व्यवसाय. याच गावात कामाच्या शोधात जत, आटपाडीसारख्या दुष्काळी तालुक्यातून अनेक कुटुंबे येऊन राहिलेली, संकेत ऊर्फ शुभम चन्नाष्पा नरळे (वय १७) याचंही कुटुंब जत तालुक्यातून कामाच्या निमित्ताने कवलापुरात येऊन राहिले होते. त्याचे वडील मजुरीचे काम करायचे. मजुरीच्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.
संकेत आठवी, नववीत असताना एकदा गावात भांडणे झाली. संकेत व त्याच्या मित्रांनी एकाला मारहाण केली. त्यातून गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांनी संकेतसह त्याच्या मित्रांना, पालकांना बोलावून समज दिली. यावेळी काहींनी संकेतला मारहाणही केली. गावासमोर झालेली मारहाण त्याच्या जिव्हारी लागली. संकेत शाळेतही भांडणे काढत असल्याने त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. त्याच्या कुटुंबावर गाव सोडण्याची वेळ आली. याचा राग संकेतच्या मनात धुसफुस होता.
कवलापूर सोडल्यानंतर संकेतचे कुटुंब माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखाना परिसरात राहत होते. तो काहीकाळ मामाकडे कोकणात गेला. त्याचा लहान भाऊ ओंकार गणेशमूर्ती बनविण्याचे काम करायचा. संकेत मामाकडे गेला असला तरी तो गावात झालेली मारहाण, कुटुंबावर गाव सोडण्याची आलेली वेळ. या घटना विसरलेला नव्हता. जुन २०२४ पूर्वी संकेत घरी परतला. त्याच्या मनातील राग काही शांत झालेला नव्हता.
याच रागाच्या भरात २४ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याने दोन मित्राला सोबत घेत कवलापूर गाव गाठले. त्याच्या मनात तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्याबद्दल द्वेष होता, त्यांच्या सांगण्यावरून शाळेतून काढल्याचे राग होता. त्याने भानुदास पाटील यांना गाठले. त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. पाटील गंभीर जखमी झाले. ते रक्ताच्या थोराळ्यात कोसळले. हल्ल्याची घटना पाहताच तरुणाचा मोठा जमाव जमा झाला. जमावाने संकेतसह त्याच्या साथीदाराचा शोध सुरू केला, संकेत जमावाच्या तावडीत सापडला. इतर दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले, जमावातील तरुणांनी संकेतला मारहाण केली. त्याला एका शेतातील शेडमध्ये नेले. तिथेही बेदम मारहाण केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक राजेश रामापरे पोलिस फौजफाट्यासह कवलापुरात दाखल झाले. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदेही दाखल झाले. गावकऱ्यांनी भानुदास पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले होते.
घटनेची माहिती घेताना पोलिसांनी संशयित संकेतला काहींनी शेतातील शेडमध्ये मारहाण करीत नेल्याची खबर मिळाली. पोलिसांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत मारहाण करणारे तरुण पसार झाले होते. रात्रीच्या अंधरात संकेतचा शोध सुरू केला. शेतातील उसात संकेत बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याला पोलिसांनी तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. पहाटे उपचार सुरू असताना संकेतचा मृत्यू झाला.
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या तरुणांचा शोध सुरू केला. ग्रामीण पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने संशयित हल्लेखोर तरुणाचा शोधासाठी ठिकठिकाणी पथके पाठविली, संशयित कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारी होते. दोन ते तीन संशयितांना कर्नाटक सीमावर्ती भागातून ताब्यात घेतले. घटनेनंतर २४ तासात सहा संशयितांना अटक केली आहे. यात जवळपास १५ ते १६ तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता,
खुनाची घटना आणि तंटामुक्त समिती अध्यक्षावर झालेल्या हल्ल्याने कवलापुरात तणावाची स्थिती होती. गावकऱ्यांनी गाव बंद ठेवला, पुढील दोन ते तीन दिवसांत पोलिसांनी खुनातील सर्वच संशयितांना बेड्या ठोकल्या. केवळ रागाच्या भरात अविचाराने केलेल्या कृत्यामुळे संकेतला स्वतःचा जीव गमवावा लागला. तसेच गावातील १५ ते १६ तरुणांनाही तुरुंगाची हवा खावी लागली.