पैठण-संभाजीनगर महामार्गावरील पुलाचे काम धिम्या गतीने:वाहतुकीस अडथळा, वाहतूक ठप्प, पैठण-छत्रपती संभाजीनगरचे अंतर किमान 20 किमीने वाढले
2 hours ago
1
पैठण-संभाजीनगर चौपदरीकरणाच्या कामाची मुदत संपली असून मागील तीन महिन्यांपूर्वी हा रोड दोन महिन्यांत पूर्ण होईल असा दावा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी केला होता. तो फोल गेला असून रस्त्याची मुदत संपली असतानाही अनेक पुलांची कामे अपूर्ण आहेत. यातच पुलाच्या कामासाठी जायकवाडी डाव्या कालव्यात मातीचा भराव करून पर्यायी वळण रस्त्यासाठी टाकण्यात आलेला होता. तो सोमवारी काढण्यात आल्यामुळे डाव्या कालव्या लगत कातपूर या ठिकाणी व जायकवाडी धरणाच्या लगत वाहतुकीची दररोज एक-दोन तास कोंडी होत आहे. पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील कातपूर फाट्याजवळील पैठण डाव्या कालव्यावरील नॅशनल हायवेमार्फत चौपदरीकरणाचे काम सुरू असून पैठण डाव्या कालव्यावरील पुलाचे काम सहा महिन्यांपासून अपूर्ण असल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी रोज होत आहे. नॅशनल हायवेने पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्ता सध्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्याचे कळवले आहे. त्यामुळे पैठणकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाताना मार्गात बदल करण्यात आला. सदर मार्ग पैठण-पाचोड रस्त्याने नानेगाव फाट्यापासून बालानगर व ढोरकीन असा पर्यायी वळण रस्ता यापुढे पुलाचे काम होईपर्यंत चालू राहील. त्यामुळे पैठण-छत्रपती संभाजीनगरचे अंतर किमान २० ते २५ किलोमीटरने वाढले असून एसटीच्या प्रवास भाड्यामध्येसुद्धा वाढ झाल्याचे कळते. यामुळे वाहनधारकासह प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. नॅशनल हायवेने यापूर्वीच निर्धारित वेळेत काम पूर्ण केले असते तर आज ही वेळ आली नसती. सध्या रब्बी हंगाम सन २०२४-२५ सुरू होऊन महिना दीड महिन्याचा कालावधी उलटला असून नॅशनल हायवेने पुलाचे बांधकाम जलदगतीने केले नाही. यामुळे कालव्यावरील तात्पुरता वळण रस्ता वरून वाहतूक चालू होते. जायकवाडी पाटबंधारे विभागाने शेतीसाठी रब्बी हंगाम पाणी पाळी क्रमांक एक आवर्तन सुरू करण्यासाठी कालव्यातील वळण रस्ता तत्काळ काढून घेण्याच्या सूचना नॅशनल हायवे यांना देण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर नॅशनल हायवे चार दिवसांपूर्वी वळण रस्ता काढून टाकण्याचे सुरू करून कालव्यात असलेला मातीभराव काढून टाकण्यात आला असून कालवा मोकळा केला आहे. यामुळे वाहतुकीस पर्यायी रस्ता पाचोडमार्गे नानेगाव फाटा, बालानगर, ढोरकीन असा लांब फेरा मारून जावे-यावे लागत आहे, तर काही वाहतूक जायकवाडी धरणाच्या रस्त्यावरून करण्यात आली आहे. या मार्गाने वाहतुकीची रोज एक तास कोंडी होत आहे. त्यातच सध्या ऊसतोड सुरू झाल्याने उसाच्या गाड्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे. पुलाचे काम त्वरित करावे जायकवाडी धरणमार्गे कालव्यावरून जड वाहतूक सुरू झाल्याने तब्बल दोन ते तीन किलोमीटर वाहतुकीची कोंडी होत आहे. या मार्गावरून जड वाहतूक रोखण्यासाठी देखील पाटबंधारे विभाग प्रयत्न करत आहे, मात्र केवळ वेळेत काम चौपदरीकरणाच्या पुलाचे होत नसल्याने आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागतो. यातच धुळीचे प्रचंड लोळ असल्याचे प्रवासी प्रा. किरण गायकवाड यांनी सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)