Published on
:
24 Nov 2024, 1:32 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:32 am
सातारा : सातारा जिल्ह्यात आठही विधानसभा मतदार संघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ करून महायुतीचा दिग्विजय साजरा होत आहे. महायुतीच्या या दिग्विजयात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांचा मोठा वाटा राहिला. विधानसभेच्या या निवडणुकीने सातारा जिल्ह्याचा एकमुखी नेता म्हणून उदयनराजेंचा ‘उदय’ झाला आहे. सातारालगतच्या चार विधानसभा मतदार संघांवर प्रभाव पाडत महायुतीच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या उदयनराजेंमुळे सातारा जिल्ह्यात ‘उदयनराज’ सुरू झाले आहे.
सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघापैकी सातारा-जावली, कोरेगाव, कराड उत्तर, वाई, कराड दक्षिण या विधानसभा मतदार संघांवर खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांचा प्रभाव राहिला. या मतदार संघांच्या उमेदवारांच्या बॅनरवर सर्वत्र उदयनराजेंचे फोटो झळकत होते. या मतदार संघांमध्ये उदयनराजेंनी कमालीचा वेळही दिला. या मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी जाहीर सभाही घेतल्या. विशेष म्हणजे कोरेगाव, कराड उत्तर व कराड दक्षिण या मतदार संघांमध्ये उदयनराजेंनी जास्तीचा वेळ दिला. राज्याचे गृहमंत्री, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार उदयनराजेंनी लोकसभेनंतर भाजप तथा महायुतीच्या विजयासाठी मेहनत घेतली. शरद पवार यांच्या जाहीर सभा झाल्यानंतर या सभांचा अंडरकरंट सायलंट करण्यात उदयनराजेंचा मोठा वाटा राहिला. जिथे जिथे पवारांच्या सभा झाल्या तिथे तिथे दुसर्या दिवशी उदयनराजेंची भिरकिट झाली. त्यामुळे या मतदार संघांमध्ये पवारांचा प्रभाव नामोहरम करण्यात महायुतीला यश आले.
निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर व मराठा आंदोलनाचे वारे होते. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांनी सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेत फडणवीस हे भोसले नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे ठासून सांगितले. विदर्भ, मराठवाडयातील सभांना व प्रचार रॅलींना उदयनराजेंनी हजेरी लावली. मराठ्यांचा राजाच फडणवीसांसोबत असल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसले. त्यामुळेच मराठा समाजातील काही घटकांचे फडणवीसांविरोधातील व महायुती विरोधातील वातावरण सायलंट करण्यात यश मिळाले. उदयनराजेंची मेहनत त्यात मोलाची ठरली.
सातारा-जावलीतून शिवेंद्रराजे भोसले निवडून येणारच होते. मात्र, उदयनराजेंनी त्यांच्या विजयाला दिग्विजयात रूपांतरित केले. शिवेंद्रराजेंनी 1 लाख 42 हजाराचे मताधिक्य मिळवले ते उदयनराजेंची भक्कम साथ असल्यामुळेच. अन्य तीन मतदार संघांमध्येही मराठा फॅक्टरचा प्रभाव फारसा जाणवला नाही. त्याचे कारणही उदयनराजेंसारखा लिडर आणि मराठा समाजाचा नेता महायुतीसोबत असल्याचे चित्र दिसल्यामुळेच. उदयनराजेंनी सातत्य राखले, मेहनत घेतली आणि योग्य टायमिंग साधले तर काय होवू शकते याचे प्रत्यंत्तर या विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्याला आले आहे.
सातारा जिल्ह्यात यापूर्वी स्व. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, स्व. विलासराव पाटील -उंडाळकर, स्व. लक्ष्मणराव पाटील, स्व. अभयसिंहराजे भोसले, रामराजे ना. निंबाळकर यांनी एकमुखी नेतृत्व केले. त्यानंतर सातारा जिल्ह्याचा लिडर म्हणून एकमुखी नेतृत्व पुढे आलेले नाही. महायुतीच्या दिग्विजयामुळे व या मोठ्या विजयात उदयनराजेंचा वाटा राहिल्याने सातारा जिल्ह्याचा एकमुखी लिडर म्हणून उदयनराजेंच्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. उदयनराजेंनी राजकारणाची सुरूवात लोकसभेला अपक्ष उभे राहून उगवता सूर्य या चिन्हावर केली. मात्र, 2024 साल उजाडले तेव्हा उदयनराजेंच्या एकमुखी नेतृत्वाचा विधानसभेच्या निवडणुकीने सूर्योदय केला.