सामना अल्सरशी

2 hours ago 2
पुढारी वृत्तसेवा

Published on

29 Nov 2024, 1:20 am

Updated on

29 Nov 2024, 1:20 am

अल्सर हा जगातील अनेक देशांमधील लोकांना होणार्‍या आजारांपैकी एक आजार आहे. पचनसंस्थेतील कुठल्याही भागात अल्सर होऊ शकतो.अल्सर हा पोटाचा आणि पचनाचा एक विकार आहे. अल्सरची तीन प्रमुख लक्षणे आहेत. दीर्घकाळ जाणवणारी अपचनाची तक्रार, जेवणानंतर पोटात दुखणे आणि रक्तस्राव ही ती लक्षणे आहेत.

ज्या भागात पाचक रस येत राहतात, अशा ठिकाणी जखम होऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील जठरात किंवा लहान आतड्यात तीव्र आम्ले जास्त प्रमाणात स्रवतात. शरीरात आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास त्या आम्लाची प्रक्रिया आतड्यातील नाजूक अंत:स्थ त्वचेवर होते व जखम होते. जठरव्रण झालेल्या रुग्णात आम्लाचे प्रमाण जास्त असते. आहारात मसाले व तेलकट, तिखट पदार्थ जास्त असल्यास जठर किंवा पक्वाशयात व्रण होण्याची शक्यता अधिक असते.

अल्सरची ओळख करायची झाली तर सुरुवातीला व्यक्तीला अनेक महिन्यांपर्यंत अजीर्ण होते किंवा पोटात दुखत राहते. साधारणपणे हे दुखणे अमाशयाच्या वरच्या भागात छातीच्या बरोबर मध्यभागी किंवा थोडेसे डावीकडे असते. हे दुखणे कष्टदायक असून, जळजळ होण्याची संवेदना होत असते. ड्युडेनल प्रकारच्या अल्सरमध्ये जेवणाच्या वेळी वेदना होऊ लागतात आणि जेवण केल्यानंतर, खास करून दूध प्यायल्यानंतर आराम वाटतो. या वेदनेला भुकेमुळे होणारी वेदना असे म्हणतात. ही वेदना रुग्णाला सामान्यतः पहाटे 2 ते 4 च्यामध्ये जाग आणते. गॅस्ट्रिक अल्सरमध्ये वेदना प्रामुख्याने जेवणानंतर एक तासाने सुरू होते. जेवण केल्यानंतर ही वेदना दूर होत नाही. रात्रीसुद्धा काही वेळा वेदना निर्माण होतात.

या दोन्ही अवस्थेत रोज किंवा अनेक दिवस, अनेक आठवड्यांपर्यंत एका ठरावीक वेळेवर वेदना सुरू होतात आणि बंद होतात. पुन्हा काही आठवडे आणि महिने या वेदना थांबतात आणि पुन्हा सुरू होतात. जसजसा हा आजार वाढत जातो तसतसा वेदनेचा कालावधी वाढत जातो. पोटाच्या वेगवेगळ्या भागात होणार्‍या अल्सरच्या आजाराला वेगवेगळी नावे आहेत आणि हे अल्सर तयार होण्याची कारणे सुद्धा वेगवेगळी असतात. पोटात तयार होणार्‍या अल्सरला गॅस्ट्रिक अल्सर आणि आतड्यांत होणार्‍या अल्सरला डुओडिनल अल्सर म्हटले जाते.

अल्सरची काही प्रमुख लक्षणे आहेत. शारीरिक त्रास, भूक कमी होणे, मळमळणे, उलटी होणे, गॅस्ट्रिक अल्सरमध्ये वजन कमी होते, छातीत जळजळणे, खाल्लेले घशापर्यंत येणे किंवा मळमळीमुळे अधिक लाळ बनणे ही लक्षणे आहेत. अल्सरच्या गंभीर अवस्थेत तोंडातून रक्त बाहेर येते किंवा मळासोबत काळे रक्त बाहेर पडते. अचानक रक्ताची उलटी झाल्यामुळे रोग्याला तीव्र मानसिक धक्का पोहोचतो किंवा रक्ताची कमतरता झाल्यामुळे अशक्तपणा जाणवतो.

अल्सरची लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेणे आवश्यक ठरते. तसेच अल्सर पूर्णपणे बरा होईपर्यंत हलके, साधे आणि पचनाला सोपे असे भोजन घ्यावे. या रुग्णांनी चांगले दळलेले आणि चांगल्या प्रकारे शिजवलेले धान्य, गहू, तांदूळ, ज्वारी किंवा दलिया खावा. या सोबतच दूध, मलई, ताजे ताक, घरी तयार केलेले पनीर हेदेखील खावे. फळांमध्ये सफरचंदाचा मुरंबा, पिकलेले केळे, तसेच लिंबू वंशाच्या फळांचे रस चालतात.अल्सरच्या रुग्णांनी तळलेले किंवा तेलात फ्राय केलेले पदार्थ खाऊ नयेत. तसेच चटणी, लोणचे, मिरची, मिरे वर्ज्य करावे. अल्कोहोल आणि तंबाखू कुठल्याही रूपात घेऊ नये.

पेप्टिक अल्सरचे निदान एका सोप्या तपासणीद्वारे करता येऊ शकते. याला ‘ अपर गॅस्ट्रोइंटेस्टीनल टेस्टर’ म्हटले जाते. या तपासणी दरम्यान रुग्णाला बेरियम नावाचे पांढरे द्रव पिण्यास सांगितले जाते व त्यानंतर त्याच्या पोटाचा एक्स रे काढला जातो. ह्या पांढर्‍या द्रवामुळे पोटातील अल्सर दिसून येण्यास मदत होते. अल्सरचे निदान झाल्यानंतर औषधोपचार सुचविले जातात. या मध्ये इन्फेक्शनमुळे अल्सर झाल्यास अँटी बायोटिक्स दिली जातात. योग्य औषधोपचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल केल्याने पेप्टिक अल्सर पूर्णपणे बरे होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article