Published on
:
17 Nov 2024, 8:18 am
Updated on
:
17 Nov 2024, 8:18 am
नाशिक : मद्यसेवन करून गोंधळ घालत रस्त्यावर दुचाकी लावून त्यावर केक ठेवून बर्थ डे सेलिब्रेशन करणार्या बर्थडे बॉयसह इतर टवाळखोरांवर शहर पोलिसांनी कारवाई केली. एका महिलेने पोलिसांच्या इन्स्टाग्रामवर तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे संबंधित महिलेने ‘थँक यू सर, आज पोलिस आले होते... कारवाई केली,’ अशी प्रतिक्रिया देत पोलिसांचे आभार मानले.
म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात शनिवार (दि. 16) रोजी मध्यरात्री उशिरा टवाळखोर युवक गोंधळ घालत वाढदिवस साजरा करीत होते. त्यांनी मद्यसेवन करून एकमेकांना शिवीगाळ करीत परिसरात गोंधळ घातला. स्थानिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केल्यावरही टवाळखोरांनी त्यांना जुमानले नाहीत. याबाबत एका महिलेने नाशिक पोलिसांच्या इन्स्टाग्रामवर खात्यावर व्हिडिओ व मेसेजद्वारे तक्रार केली. पोलिस आयुक्तालयाने या तक्रारीची तातडीने दखल घेत म्हसरूळ पोलिसांना कळवले. गुन्हे शोध पथकाने व्हिडिओद्वारे संशयितांची ओळख पटवून त्यांना काही वेळातच ताब्यात घेतले. तसेच कारवाईची माहिती संबंधित तक्रारदार महिलेसही दिली. काही क्षणात कारवाई झाल्याने नागरिकांनीही पोलिसांच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, ‘सुरक्षित नाशिक’ या संकल्पनेंतर्गत शहरात नागरिक केंद्रित पोलिसिंग सुरू आहे. व्हॉट्सअपसह इन्स्टाग्राम, एक्सवर नागरिकांमार्फत तक्रार मिळताच कारवाई केली जात आहे. या आधीही दोन विद्यार्थिनींनी त्यांना छळणार्या दोघांविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले होते. तर व्हॉट्सअप हेल्पलाइनवरील तक्रारीवरून अनेकांवर गंभीर गुन्हे देखील दाखल झाले आहेत.
शहर पोलिसांनी 9923323311 क्रमांकाचा व्हॉट्सअप क्रमांक सुरू केला आहे. त्यावर नागरिकांनी न घाबरता तक्रार नोंदवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या क्रमांकावर आतापर्यंत चार हजार 227 तक्रारी आल्या असून, त्यातील 49 तक्रारी महिला सुरक्षेसंदर्भात आहेत. तसेच तक्रारी आल्यानंतर त्यावर कोणती कार्यवाही केली याचीही माहिती पोलिसांकडून तक्रारदारास कळवली जात आहे.
महिला सुरक्षेसह नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास पथके प्राधान्य देत आहेत. सोशल मीडियावर प्राप्त होणार्या तक्रारींचा नियमित आढावा घेतला जात असून, त्यावर आवश्यकतेनुसार कारवाई होत आहे. नागरिकांनी परिसरातील गैरप्रकारांबाबत माहिती द्यावी. सत्यता पडताळून पथके संशयितांवर कारवाई करतील.
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.