खल्लार येथील प्रचार सभेदरम्यान नवनीत राणांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.Pudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 10:42 am
Updated on
:
17 Nov 2024, 10:42 am
अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदार संघात खल्लार येथील प्रचार सभेदरम्यान नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर खुर्च्या फेकून हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.१६) रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घडली. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उपस्थितीत खल्लारमध्ये ही सभा (Maharashtra Assembly Polls) आयोजित करण्यात आली होती.
या सभेदरम्यानच हा हल्ल्याचा प्रयत्न झाला. शनिवारी रात्री प्रचार सभा आटोपल्यानंतर नवनीत राणा परत निघाल्या असता अज्ञात कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन गट आमने-सामने आल्याचे देखील दिसून आले. एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक झाली. काही लोक नवनीत राणा यांच्या अंगावर धावून येण्याचाही प्रयत्न करत होते. नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान हल्लेखोरांपैकी काहींनी त्यांच्यावर थुंकण्याचा देखील प्रयत्न केला. यात युवा स्वाभिमान पक्षाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते जखमी झाले आहेत. घटनेनंतर नवनीत राणा यांच्यासह त्यांचे समर्थक खल्लार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले होते. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. (Maharashtra Assembly Polls)
ऐन विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या अंतिम टप्प्यात हा हल्ल्याचा प्रयत्न झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर खल्लार गावात तणावाचे वातावरण आहे.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.