Published on
:
17 Nov 2024, 12:18 pm
Updated on
:
17 Nov 2024, 12:18 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील ६२पैकी ४७ जागांवर भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे बारा विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे. तर उर्वरित ३५पैकी तब्बल १९ मतदारसंघांमध्ये भाजपने कुणबी समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे. याची सरासरी टक्केवारी ५४.२८ इतकी आहे. विदर्भात लोकसंख्येच्या प्रमाणात भाजपने उमेदवारीत प्रतिनिधीत्व देऊन सामाजिक समीकरण साधल्याचा विश्वास समाजबांधवांमधून व्यक्त होत आहे.
पटोलेंविरुद्ध कुणबी समाजातील अविनाश ब्राह्मणकर
विदर्भात भाजपच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांमध्ये उत्तर नागपूर, उमरेड, आमगाव, गडचिरोली, आरमोरी, चंद्रपूर, राळेगाव, आर्णी, उमरखेड, मेळघाट, मूर्तिजापूर, वाशीम हे राखीव आहेत. उर्वरित मतदारसंघांचा विचार करता नागपूर जिल्ह्यात भाजपने पश्चिम नागपूरमधून सुधाकर कोहळे, दक्षिण नागपूरमधून मोहन मते, सावनेरात डॉ. आशिष देशमुख, हिंगण्यात समीर मेघे यांना उमेदवारी दिली आहे. यासोबतच भंडारा जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध कुणबी समाजातील अविनाश ब्राह्मणकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी मतदारसंघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धक्का देण्यासाठी कृष्णलाल सहारे यांना संधी देण्यात आली आहे. सहारे यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीतील समाजबांधवांच्या उपस्थितीने वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीत तळ ठोकण्यासाठी बाध्य केले. राजुऱ्यात देवराव भोंगळे तर वरोऱ्यात करणे देवतळे हे लढत देत आहेत.वर्धा जिल्ह्यातील चारपैकी दोन मतदारसंघांत भाजपचे कुणबी उमेदवार आहेत. वर्ध्यात पंकज भोयर तर आर्वीत सुमित वानखेडे लढत देत आहेत. अमरावती जिल्ह्यातील तिवस्यात राजेश वानखेडे, अचलपूरमध्ये प्रवीण तायडे आणि धामणगाव रेल्वेत प्रताप अडसड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्वमध्ये रणधीर सावरकर, अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे; बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये अॅड. आकाश फुंडकर, जळगाव-जामोदमध्ये माजी मंत्री संजय कुटे, चिखलीत श्वेता महाले तर वाशीम जिल्ह्यातील कारंजात सई डहाके यांना उमेदवारी दिली आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात कुणबी, मराठा समाजाला उमेदवारीत प्रतिनिधीत्व
पूर्व आणि पश्चिम विदर्भातील एकूण अकराही जिल्ह्यांमध्ये कुणबी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. हीच बाब लक्षात घेऊन लोकसंख्येच्या प्रमाणात कुणबी व मराठा समाजाला भाजपने उमेदवारीत प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. मागील काही वर्षांत ओबीसी मंत्रालयाची स्थापना, ओबीसी वसतिगृह, ओबीसींसाठी स्वाधार योजना अशा अनेक नवनवीन भाजपने सुरू केल्या. केवळ योजनांच्या माध्यमातूनच नव्हे तर सत्तेतही त्यांना सहभागी करून घेण्यासाठी निम्म्याहून अधिक जागांवर कुणबी व मराठा उमेदवार दिले आहेत.
राहुल गांधींचा हा कुठल्या न्याय?
काँग्रेस नेते राहुल गांधी ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याचे वचन आपल्या सभांमधून देत आहे; पण, विदर्भात उमेदवारी वाटप करताना त्यांच्या पक्षातील नेत्यांना; नव्हे खुद्द त्यांनाही या बाबीचा विसर पडल्याचे दिसून येते. विदर्भात बहुसंख्य असलेल्या कुणबी व मराठा समाजाला अपेक्षित संधी देण्यात आली नाही. हा कुठला न्याय आहे, अशा शब्दांत कुणबी समाजातील नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पटोले, वडेट्टीवारांविरुद्ध भाजपचे ‘कुणबी अस्त्र’
विदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे मोठे नेते आहेत. या दोन्ही नेत्यांच्या मतदारसंघात भाजपने अविनाश ब्राह्मणकर आणि कृष्णलाल सहारे यांच्या रुपाने कुणबी उमेदवार दिले आहेत. पटोलेंच्या साकोलीत कुणबी विरुद्ध कुणबी अशी थेट लढत होत आहे.