Published on
:
17 Nov 2024, 2:05 pm
Updated on
:
17 Nov 2024, 2:05 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : Jasprit Bumrah Border Gavaskar Trophy : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडून खूप अपेक्षा आहेत. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून हॅट्ट्रिक साधावी, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराहने धारदार गोलंदाजी करून कांगारू संघाचे कंबरडे मोडावे अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. दरम्यान, ही मालिका बुमराहसाठी चांगली गेली तर तो माजी कर्णधार कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडू शकतो.
बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चार सामने खेळले आणि चांगल्या गतीने विकेट्स घेतल्या, तर तो ऑस्ट्रेलियामध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल. या यादीत सध्या कपिल देव पहिल्या क्रमांकावर आहेत. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये 51 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये 50 हून अधिक बळी घेणारा ते एकमेव भारतीय गोलंदाज आहे. या यादीत अनिल कुंबळे (49) दुसऱ्या स्थानावर, आर अश्विन (39) तिसऱ्या स्थानावर, बिशन सिंग बेदी (35) चौथ्या स्थानावर आणि जसप्रीत बुमराह (32) पाचव्या स्थानावर आहे.
कपिल देव यांचा विक्रम मोडण्यासाठी बुमराहला अजूनही 20 विकेट्सची गरज आहे. बुमराहच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 5 पैकी 4 सामने खेळले तरी तो कपिल देवला सहज मागे टाकेल. बुमराहने ऑस्ट्रेलियातील शेवटच्या कसोटी मालिकेत 20 हून अधिक बळी घेतले होते.
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी बळी घेणारे भारतीय गोलंदाज
51 विकेट : कपिल देव
49 बळी : अनिल कुंबळे
39 विकेट्स : आर. अश्विन
35 बळी : बिशनसिंग बेदी
32 बळी : जसप्रीत बुमराह
31 बळी : एरापल्ली प्रसन्ना
31 बळी : मोहम्मद शमी
31 बळी : उमेश यादव
31 बळी : इशांत शर्मा
जसप्रीत बुमराहची कसोटी क्रिकेट कारकीर्द
बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 40 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याला 77 डावांमध्ये 20.57 च्या सरासरीने 173 यश मिळाले आहे. कसोटीत 10 वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. 27 धावांत सहा बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
आर अश्विनलाही कपिल देव यांना मागे टाकण्याची संधी आहे, पण सांघिक संयोजनानुसार अश्विन कदाचित पहिल्या काही सामन्यांमध्ये बाहेर बसू शकतो. कपिल देव यांना मागे टाकण्यासाठी त्याला 13 विकेट्सची गरज आहे.