आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येकाने नेहमी जागरूक असावे:जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे प्रतिपादन, 10 दिवसीय शिबिराचा समारोप

2 hours ago 1
विद्यार्थी तत्पर असल्यास आपत्ती व्यवस्थापन चांगल्याप्रकारे होऊ शकते, जीवीतहानी टाळल्या जावू शकते, यासाठी प्रत्येकाने जागरूक असावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित ‘आव्हान - २०२४’ चान्सलर्स ब्रिगेड या आंतरविद्यापीठ आपत्ती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, एन.डी.आर.एफ. पुणे येथील असिस्टंट कमांडन्ट जस्टीन जोसेफ, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. अविनाश बोर्डे, डॉ. विद्या शर्मा, प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी, राज्यपाल नामित समिती सदस्य डॉ. रामश्वर कोठावळे, संजय कवळे, डॉ. मल्लिकार्जुन करजगी, डॉ. रमेश लिमसे, मो. शकिल अ. करीम, डॉ. शाम खंडारे, रा.से.यो. संचालक डॉ. निलेश कडू उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन हे स्थानिक पातळीवरच झाले पाहिजे. शासनाने म्हणूनच त्याकडे विशेष लक्ष पुरवले आहे. कारण भौगोलिकदृष्ट्या आपत्तीचे प्रकार वेगवेगळे असतात. आसाममध्ये आलेल्या चक्रीवादळाने जी हानी झाली होती, त्यानंतर तेथील स्थानिक पातळीवरच आपत्ती निवारणाचे कार्य नागरिकांनी केले व आता कोणत्याही आपत्तीला ते समर्थपणे तोंड देत आहेत. त्यामुळे जिल्हा, तालुका, गांव पातळीवर प्राधान्याने आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करुन त्यात स्थानिकांना स्थान द्यावे, जेणेकरुन त्या त्या ठिकाणच्या आपत्तीप्रसंगी नागरिकच निवारण्यासाठी सक्षम ठरतील. समाजहिताकरीता महत्वपूर्ण - कुलगुरू डॉ. बारहाते एन.डी.आर.एफ. करीत असलेले कार्य समाज आणि राष्ट्रहिताकरीता अत्यंत महत्वाचे असल्याचे मत अध्यक्षीय भाषणातून कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी व्यक्त केले. शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही आपत्तीप्रसंगी प्रशासनाला सहकार्य करावे. आपले महाविद्यालय, आपले शेजारी यांनाही आपत्तीप्रसंगी मदतकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिबीराचे अतिशय उत्कृष्टरित्या आणि सूक्ष्म पध्दतीने नियोजन केल्याबद्दल आयोजन समितीचे त्यांनी अभिनंदन केले. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी म्हणाले, आपत्ती पूर्व व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे व ते तयार व्हावेत, यासाठी राज्यपाल महोदयांनी आव्हान स्पर्धा सुरु केली. या शिबिरात ज्यांनी प्रशिक्षण घेतले, त्यांनी आपल्या भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करावे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article