महाविकास आघाडीच्या भक्कम साथीने विजयाची पताका घेऊन विधानसभेत जाणार – संजय कदम

2 hours ago 1

लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवकच असला पाहिजे हे ब्रिद लक्षात घेऊन आपल्या घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही आपण ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यत लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणून यशस्वी मार्गक्रमण केले आहे. हा एक इतिहास आहे. त्यामुळे पुन्हा आता विधानसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा हा शिलेदार रयतेच्या पाठिंब्याने आणि महाविकास आघाडीच्या भक्कम साथीने विजयाची पताका घेऊन विधानसभेत जाणार म्हणजे जाणारच अशा प्रकारचा जबरदस्त आत्मविश्वास संजय कदम यांनी दापोली येथे बोलताना व्यक्त केला.

दापोली विधानसभा मतदार संघात राज्यामध्ये कोणत्याही विधानसभा क्षेत्रात नसलेली वैशिष्टये आहेत. हा मतदारसंघ 3 भारतरत्नांनी आणि अनेक महनीय अशा व्यक्तीमत्वांनी पावन झालेला असा हा वैशिष्ट्यपुर्ण मतदारसंघ आहे. मात्र असे असले तरी या महामानवांचे एकत्रित असे विचाराचे स्मारक या मतदारसंघात कोठेच नाही.

मतदारसंघातील दापोली आणि मंडणगड तालुक्याला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. पर्यटनाला या तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात वाव आहे. मात्र आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी येथील काहीनी पर्यटन व्यावसायिकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम किनारपट्टीवरील व्यावसायिकांना भोगावा लागत आहे. हे पर्यटक व्यवसायिक अजिबात विसरलेले नाहीत.

आपण निवडून आल्यावर दापोली तालुक्यातील मुख्य मार्गावरचे रस्ते हे खड्डेमुक्त करण्यावर भर देणार असून पर्यटनातून व्यवसाय वृध्दीसाठी व रोजगारासाठी प्रयत्न करणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांनी सांगितले.

दापोली तालुक्यामध्ये महाविकास आघाडीसमोरील विरोधी उमेदवाराने प्रचंड मोठी दडपशाही उभी केली आहे. विधानसभा मतदारसंघातील कोणतेही विकास काम घ्या वर्षभरात ते काम लोकोपयोगी राहीलेलेच नाही. मतांच्या जोगव्यासाठी 3 हजार 500 कोटी रूपयांचा निधी आणला असे सांगितले जाते. मात्र हा निधी कोठे गेला. असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. खोटी आश्वासने, भपकेबाजपणा व मार्केटींगच्या तंत्रावर आपणच विकास पुरूष असल्याचा आव दापोली विधानसभा मतदारसंघात आणला जात आहे. मात्र पैशांने सर्वच काही विकत घेता येत नाहीत त्यासाठी माणुसकीही महत्वाची बाब असून आपण या निवडणुकीत धनशक्ती विरूध्द जनशक्ती हाच नारा दिला असून आपल्याला माणुसकीच्या मुद्यांवरच ही निवडणुक लढवायची असून सर्वसामान्य जनतेलाही बदल हवा आहे व जनता आपल्या रूपाने हा बदल मतदारसंघामध्ये घडवणार असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांनी व्यक्त केला.

आज दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेला कोणी वाली उरला नाही. सरकारी कामासाठी अनेकदा उंबरठे झिजवावे लागत आहेत. साधा सातबारा वेळीच जनतेला उपलब्ध होत नाही. जनतेचे ऐकून घेणारा कोणी आहे का? असा प्रश्न पडत असून लोकप्रतिनिधी हे आपल्या गाडीच्या काचा खाली करून तालुक्यात फिरत नाहीत. तालुक्यात भयमुक्त वातावरण असताना त्यांना मागे पुढे पोलिस संरक्षण घेऊन तालुक्यात फिरावे लागते आहे. असा लोकप्रतिनिधी काय कामाचा असा सवाल उपस्थित करतानाच दापोली विधानसभा मतदारसंघ हा स्वर्गाय बाळासाहेबांच्या भगव्या विचारांनी प्रेरित झालेला असा मतदार संघ असून या मतदारसंघाला गद्दारीचा डाग लागला आहे. बाळासाहेबांच्या अस्थी या तामसतीर्थ येथील पवित्र स्थानी विसर्जित करण्यात आल्या असून त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याचे आश्वासन काहींनी दिले होते. ते स्मारक झाले का? असा सवाल उपस्थित करतानाच दापोली विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा निष्ठेचा भगवा फडकवून दाखवणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे विचारच राज्याला प्रगतीकडे आणि देशाला विकासाची नवीन दिशा दाखवतील असा विश्वास असल्याने दापोली विधानसभा मतदार संघातील दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील गावांमधून मोठया प्रमाणात दररोज शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रवेश होत असून परिवर्तनाच्या लढाईत मतदार संघातील अनेक गावे आमिषे झुगारून सामील होत आहेत. त्यामुळे आपल्या लढाईला बळ आले असून आपण जनतेच्या पाठिंब्यावर ही लढाई जिंकणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दापोली मतदारसंघात शिवसेना व भाजपामध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत. याबाबत विचारले असता हुकूमशाही पध्दतीने वागण्याची विरोधी उमेदवाराची पध्दत असून दापोली मतदारसंघ हा विचारांचा पायंडा असलेला मतदारसंघ आहे. सुसंस्कृत व सुशिक्षित असा हा मतदार संघ आहे. त्यामुळे येथील जनता ही नेहमीच सत्याच्या बाजूने उभी राहिली असल्याचे दिसत आहे. आज पैशाच्या जोरावर व दडपशाहीच्या जोरावर अनेकजण हा मतदारसंघ आपण विकत घेतला असल्याच्या अविर्भावात वावरत असून दापोलीकर जनता ही सुज्ञ असून परिवर्तनाच्या लढाईत ती निश्चितच सामील होईल असा विश्वास व्यक्त करतानाच आपण सर्वसामान्य जनतेसाठी ही निवडणुक लढवत असून जनतेच्या समस्या दूर करण्यावरच आपला आगामी काळामध्ये भर असणार आहे, असे मत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांनी व्यक्त केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article