दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रचार रॅलीत अभिवादन करताना देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीसPudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 5:16 pm
Updated on
:
17 Nov 2024, 5:16 pm
नागपूर : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बरेच काही शिकण्याची गरज आहे. नौटंकी फार काळ चालत नाही. मविआमध्ये नेतेपदावरुन भांडणे आहेत, दुसरीकडे आमच्यात कुठलीही स्पर्धा नाही. त्यांच्याकडे मुद्दे नसल्याने ते रेटून खोटं बोलत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आम्ही विकासावर जनतेला मते मागत आहोत. मविआकडे कुठलेच मुद्दे नाहीत. काँग्रेसला केवळ अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करायचे आहे. ते जेहादची घोषणा करणार असतील, तर आम्हालाही चोख उत्तर द्यावेच लागेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
नागपुरात दक्षिण पश्चिम या आपल्या मतदारसंघात पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत प्रचार रॅली दरम्यान माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. धृवीकरणामुळे समाजाचे नुकसान होते असे सांगून फडणवीस म्हणाले, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे, हे राहुल गांधींनी सांगितले पाहिजे. समाजातील प्रगल्भ लोकांनी या गोष्टींचा विचार करायला हवा. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, राहुलजी विरोधी पक्ष नेते असले तरी त्यांनी मोदीजींकडून काही शिकले पाहिजे. जमिनीशी जुळून तासनतास काम करावे लागते. आज महाराष्ट्रात लोकांचा निर्धार पक्का झाला आहे. ते महायुतीच्या पाठीशी आहेत.