Published on
:
17 Nov 2024, 3:38 pm
Updated on
:
17 Nov 2024, 3:38 pm
नंदुरबार : आपल्याला काँग्रेसला हद्दपार करायचे आहे. अक्कलकुवा मतदारसंघ विकासात क्रमांक एकचा बनवण्यासाठी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. अक्कलकुवा येथे महायुतीचे उमेदवार आमदार आमशा पाडवी यांच्या प्रचारार्थ धडगांव येथे जाहीर सभेत ते बोलत होते.
सभेला सुरुवात करण्या पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखा आदिवासी बायहो राम राम असे स्थानिक आदिवासी पावरी बोली भाषेत मतदारांना आवाहन केले. यावेळी त्यांनी स्थानिक आदिवासी पावरी बोली भाषा बोलून लोकांची मने जिंकत महायुतीचे उमेदवार आमशा पाडवी यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. (Maharashtra assembly poll)
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,आमशा पाडवी निवडूनच येणार व विजयाचे सीताफळ फोडणार म्हणजे फोडणार. काँग्रेसचे के. सी. पाडवी यांनी 35 वर्षात काय केले ? 35 वर्षात एकतरी प्रकल्प आला का? असा सवाल शिंदे यांनी यावेळी केला. रामाने तरी 14 वर्षे वनवास भोगला तुम्ही 35 वर्षांपासून वनवास भोगत आहात, तुम्ही रोजगार साठी स्थलांतर करत होता आता तुम्ही आमदारालाच स्थलांतर करून पाठवून द्या,असंही ते यावेळी म्हणाले.
निवडणूक आल्यावर विकासाच्या गप्पा मारल्या जातात आता अशा आमदाराला गायब करण्याची हीच संधी आहे. के. सी. पाडवीनी मुंबई कडेच एखादा मतदार संघ बघून तिथेच निवडणूक लढवावी असे सांगून आम्हाला एसी मध्ये बसणारा आमदार नको, गरिबांबरोबर भाकरी खाणारा आमदार पाहिजे ,सर्व सामान्य आमदार पाहिजे म्हणून आमशा पाडवी यांना निवडून आणायचे आहे, असही शिंदे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आचार संहिता संपल्यावर लगेच मोलगी तालुक्याचा प्रश्न मार्गी लावू तसेच रोजगार निर्मिती साठी उद्योग मंत्र्याशी बोलून लवकरच एम आय डी सी उभारू. महायुती सोबत राहून मलाई खाऊन मोठे होऊन महायुतीच्या विरोधात बंडखोर उमेदवाराला व स्थलांतर होणाऱ्या आमदाराला हद्दपार करा. मतदार संघात एक लाख पाच हजार लाडकी बहिणींना लाभ दिला असून पुढील हफ्ताही लवकरच खात्यात जमा होतील. या अती दुर्गम भागासाठी लवकरच पुन्हा दोन ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देऊ असेही आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.(Maharashtra assembly poll)
यावेळी अक्कलकुवा धडगावचे महायुतीचे उमेदवार आमशा पाडवी,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी , जी. प. सदस्य विजयसिंग पराडके, नगराध्यक्ष धनसिंग पावरा, धडगांव पंचायत समिती उपसभापती भाईदास वळवी, धडगांव पंचायत समिती सभापती हिराताई पराडके,सभापती, सीताराम पावरा, संदीप वळवी, किरसिंग वसावे, ललित जाट, राम रघुवंशी यासह शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.