Published on
:
17 Nov 2024, 3:51 pm
Updated on
:
17 Nov 2024, 3:51 pm
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारमधील परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यासोबतच त्यांनी आम आदमी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडले आहे. पक्षाने लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असे म्हणत त्यांनी राजीनामा दिला. यासाठी त्यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे.
यमुना नदी केजरीवाल सरकारच्या काळात अधिक प्रदूषित झाली असल्याची टीका गेहलोत यांनी पत्रात केली आहे. आम आदमी पक्षाने केंद्र सरकारसोबत लढण्यामध्ये जास्त वेळ वाया घातल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी पत्रात केजरीवालांच्या बंगल्याला शीशमहल म्हटले आहे. दिल्लीतील लोकांना मूलभूत सेवा देण्याची सरकारची क्षमता कमी झाली आहे. हे आता उघड झाले आहे.
गेहलोत यांचा मंत्रीपदाचा राजिनामा मुख्यमंत्री अतिशी यांनी स्वीकारला आणि म्हटले आहे की, हे भाजपचे षडयंत्र आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी आम आदमी पक्षाला हा मोठा झटका बसला असल्याचे बोलले जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे वॉशिंग मशीन सक्रिय झाले आहे. या मशीनच्या माध्यमातून अनेक नेत्यांचे भाजपामध्ये पक्षप्रवेश सुरू होतील, असा आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला.