पोलिसांनी डोंबिवलीसह कल्याण ग्रामीणवर ड्रोनच्या घिरट्या सुरू केल्या आहेत.Pudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 2:02 pm
Updated on
:
17 Nov 2024, 2:02 pm
डोंबिवली : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तिसरा डोळा ॲक्टिव्ह झाला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक भागामध्ये आचारसंहितेचा भंग होऊन कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी डोंबिवलीसह कल्याण ग्रामीणवर ड्रोनच्या घिरट्या सुरू केल्या आहेत. या दोन्ही मतदासंघांत कुठेही संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिस तातडीने पोहोचतील आणि परिस्थिती नियंत्रणात आणतील, यासाठी हायटेक यंत्रणा राबविली जात आहे.
पोलिस ठाण्यांच्या हद्दीवर वॉच ठेवण्याकरिता ४० ड्रोन कॅमेरे
निवडणूक काळात कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी रूट मार्चसह जनजागृती करण्यासंदर्भात विद्यमान पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी हायटेक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंबिवलीतील आठही पोलिस ठाण्यांच्या हद्दीवर वॉच ठेवण्याकरिता ४० ड्रोन कॅमेरे सज्ज केले आहेत. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंबिवलीत प्रचारासह मतदान प्रक्रिया निर्धोकपणे पार पडता यावी, याकरिता लक्ष केंद्रित केले आहे.
या पार्श्वभूमीवर डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी मतदान करताना मतदारांची गैरसोय होऊ नये, तसेच गर्दीच्या ठिकाणी डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमसह लगतच्या ग्रामीण पट्ट्यावर टेहाळणी करण्याकरिता 8 ड्रोन कार्यान्वित केले आहेत. विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पवार आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांनी पश्चिमेत कोपर रोडला ड्रोनच्या साहाय्याने प्रत्येक भागामध्ये निरीक्षण केले. हे निरीक्षण सकाळ-संध्याकाळ, वेळप्रसंगी रात्रीच्या सुमारास देखील केले जाणार असल्याचे एसीपी सुहास हेमाडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.