Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा टप्पा सुरू झाला आहे. मात्र ज्या विदर्भाच्या हातात सत्तेची चावी आहे त्या विदर्भाचेच प्रश्न निवडणुकीच्या प्रचारातून तसेच पक्षाच्या आणि उमेदवाराच्या जाहीरनाम्यातून बाद असल्याचे दिसत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून विदर्भासाठी घातक आहे.
विदर्भात निवडणूक (Assembly Elections 2024) लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने आणि पक्षानी विदर्भाच्या मुद्द्यांवर आणि विदर्भा संदर्भातील अनेक प्रश्ना संदर्भात काहीच उल्लेख नाही त्यामुळे विदर्भातील मतदारांनी मतं मागण्याकरिता जे कुणी उमेदवार येतील त्यांना खालील प्रश्न विचारण्याची हीच योग्य वेळ आहे, कारण सध्या पक्ष आणि त्यांचे उमेदवार खिंडीत सापडले आहेत. आज जर आपण त्यांच्यापासून कमिटमेंट घेतली तर भविष्यामध्ये आपण त्यांना जबाबदेही ठरवू शकतो कारण आपल्याला आठवत असेल की गेल्यावर्षी दहा दिवसाच्या नागपूर अधिवेशनामध्ये एक सुद्धा प्रश्न विदर्भातील अनेक समस्या संदर्भामध्ये कुठल्याच आमदारांनी विचारला गेला नव्हता, आणि त्याचमुळे मला नाईलाजाने पत्रकार कक्षा मधून यासंदर्भात जाब विचारावा लागला होता.
त्यामुळे उमेदवारांना खालील प्रश्न विचारा
1)विदर्भाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्याकरिता आपण काय करणार आहात?
2) विदर्भातील 314 सिंचन प्रकल्पापैकी 182 प्रकल्प अर्धवट आहेत, त्याकरिता आपण प्रयत्न करणार आहात काय?
3) विदर्भातील जवळपास 3 हजार ओसाड पडलेल्या गावांकरीता आपण काय करणार आहात?
4)विदर्भात आज दिवसाला जवळपास 12 शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याकरिता आपण काय करणार आहात?
5) विदर्भातील बंद पडलेल्या कापड गिरण्या, सूतगिरण्या, साखर कारखाने याकरिता आपण काय करणार आहात?
6) चंद्रपूर ते कोराडी ह्या पट्ट्यातील औष्णिक प्रकल्पामुळे विज विदर्भात तयार होते मात्र त्यामुळे वाढत असलेल्या प्रदूषणाचा प्रश्न आपण सरकार दरबारीं उचलणार आहत काय?
7) सावकार ग्रस्त शेतकरी तक्रार मर्यादा पंधरा वर्षे वरून तीस वर्ष करण्याचा प्रश्न आपण विधानसभेत उचलणार आहात का?
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना केवळ एक लाख रुपये अनुदान दिले जाते ते वाढवून किमान पाच लाख रुपये करण्याकरिता आपण काय प्रयत्न करणार आहात?
8)वेगळ्या विदर्भ बाबत आपली काय भूमिका आहे हे स्पष्ट करा? वेगळा विदर्भ व्हायला हवा की नको?
9) विदर्भामधील सिंचन योग्य 12 लाख हेक्टर पैकी केवळ तीन लाख हेक्टर जमीन आतापर्यंत ओलिताखाली आली आहे, जमीन ओलिताखाली आणण्याकरिता आपण प्रयत्नशील राहणार आहात काय?
10)विदर्भातील साठ हजार एकर जमीन ही बंजर झाली आहे, त्याकरिता आपण प्रयत्नशील राहणार आहात काय?
11) विदर्भामधील अधिवेशनामध्ये विदर्भाचे प्रश्न मांडण्यास प्राधान्य देणार आहात काय?
12) विदर्भातील धान, सोयाबीन,कापूस, चणा याचे जे भाव पडले आहेत त्याकरिता आपण आवाज उचलणार आहात काय?
13) विदर्भामध्ये उद्योग आणण्याकरिता आपण काय करणार आहात?
14) केरळ सारख्या छोट्या राज्यांमध्ये पाच विमानतळ आहेत विदर्भात मात्र केवळ एक विमानतळ आहे विदर्भातील इतर विमानतळ चालू करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात?
विदर्भाचे हे असे अनेक प्रश्न आहेत, त्याच प्रमाणे मराठवाड्याचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे मराठवाड्याच्या लोकांनी त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांनी तेथील भावी आमदारांना विचारावेत. दर पाच वर्षांनी येणारा (Assembly Elections 2024) लोकशाहीचा हा उत्सव, त्याचमुळे येणारे २ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. दाखवल्या गेलेल्या क्षणिक प्रलोभनांना बळी न पडता आपले जीवनमान ज्यामुळे बदलेल त्याकरिता थोडा वेळ काढा, हिम्मत दाखवा, हेच या प्रसंगी सुचवतो.
*लेखक: प्रकाश पोहरे*
*प्रतिक्रिया देण्यासाठी* 98225 93921 वर *’थेट प्रकाश पोहरेंना संपर्क करा किंवा आपल्या प्रतिक्रिया याच व्हॉट्सअप वर पाठवा.’ प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.*