Published on
:
17 Nov 2024, 12:03 pm
Updated on
:
17 Nov 2024, 12:03 pm
गडचिरोली : राज्य सरकारने उद्योगपतींचं १६ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. महाराष्ट्रात अडीच लाख रिक्त पदे असून बेरोजगारी प्रचंड आहे अनेक युवक आत्महत्या करत आहेत. तसेच जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी का घाबरतात, असा सवाल काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज देसाईगंज येथील सभेत केला.
प्रियंका गांधी यांनी महाविकास आघाडीचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार रामदास मसराम आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार मनोहर पोरेटी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकार महत्त्वाची बंदरे, विमानतळ आणि अन्य सरकारी कंपन्या अदानीच्या घशात घालत असल्याचा आरोप केला. सरकारचं धोरण चुकीचं आहे, असं सांगून प्रियंका गांधी यांनी राज्यात महाविकास सरकार आल्यास नागरिकांना 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं. महाराष्ट्रात लोकांनी निवडून दिलेले सरकार भाजपाने चोरलं अशी टीकाही त्यांनी केली.