राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना आज बारामतीत टेक्स्टाईल पार्कमध्ये जाताना अडवण्यात आलं. प्रतिभा पवार यांच्यासोबत त्यांची नात रेवती सुळे या देखील होत्या. टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर प्रतिभा पवार यांना थांबवण्यात आलं होतं. जवळपास अर्धा तास त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता. अखेर अर्ध्या तासानंतर प्रतिभा पवार यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला. या दरम्यान प्रतिभा पवार यांनी एक व्हिडीओ देखील बनवला. या व्हिडीओत सुरक्षा रक्षक आपल्याला आतमधून कोणतीही गाडी सोडण्यासाठी परवानगी दिलेली नसल्याचं म्हटलं आहे. यानंतर आता टेक्सटाईल पार्कच्या व्यवस्थापकांकडून खुलासा करण्यात आला आहे.
टेक्स्टाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांनी या घटेनवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिभा पवार ज्या गेटने आल्या तो गेट मालवाहतुकीचा असल्याचं अनिल वाघ यांनी स्पष्ट केलं आहे. प्रतिभा पवारांना सुरक्षा रक्षकाने ओळखलं नाही, असा देखील दावा अनिल वाघ यांनी केला आहे. “प्रतिभा पवार ज्या गेटवर आल्या ते गेट मालवाहतुकीचं गेट आहे. या गेटने येणाऱ्या गाड्या फक्त मालवाहतुकीच्या येत असतात. जे कोण या पार्कमध्ये येत असतात, त्यासाठी येण्यासाठी आपल्याकडे दुसरे गेट उपलब्ध आहेत. प्रतिभा काकी ज्या गेटने आल्या त्या गेटवर असणारा सुरक्षा रक्षक हा परप्रांतीय होता. त्याने प्रतिभा काकूंना ओळखलं नाही”, असं अनिल वाघ यांनी स्पष्ट केलं.
“मला जेव्हा माहिती मिळाली की, प्रतिभा काकू गेटवर आल्या आहेत. यानंतर काही क्षणातच मी त्यांना आतमध्ये सोडण्याच्या सूचना केल्या. तसं बघायला गेलात तर शॉपिंग कॉम्प्लेक्स या गेटपासून अर्ध्या किलोमीटरवर आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने त्यांना दुसऱ्या गेटने जाण्याची सूचना केली”, असं अनिल वाघ म्हणाले.
हे सुद्धा वाचा
‘आता त्यांच्याकडे सत्ता, ते कसंही वागू शकतात’
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “माझी आई प्रतिभा पवार आणि माजी मुलगी रेवती या बारामतीला टेक्स्टाईल पार्कमध्ये गेल्या होत्या. त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यासाठी गेटवर 25 मिनिटे थांबवण्यात आलं. त्या विनंती करत होत्या की, आम्हाला आत सोडा. पण त्यांना काही आत सोडण्यात आलं नाही. योगायोग बघा, जो टेक्स्टाईल पार्क शरद पवारांनी बारामतीत आणला, आज त्यांच्याच पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जायला 25 मिनिटे थांबावं लागत आहे. पण ठिक आहे. आता त्यांच्याकडे सत्ता आहे. त्यामुळे ते लोकांना कसेही वागू शकतात. ठिक आहे तो त्यांचा अधिकार आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.